इचलकरंजीतील नाट्यगृहाची स्थिती केविलवाणी
By Admin | Published: December 13, 2015 11:05 PM2015-12-13T23:05:58+5:302015-12-14T00:09:19+5:30
नाट्यगृहात घंटा कधी वाजणार? : नाटकांबरोबर एकांकिका स्पर्धा रद्द करण्याची नामुष्की
इचलकरंजी : शहरातील सांस्कृतिक ठेवा जतन करून तो वृद्धिंगत करणाऱ्या नगरपालिकेच्या श्रीमंत घोरपडे नाट्यगृहाची देखभाल-दुरुस्तीकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने केविलवाणी स्थिती झाली आहे. नाट्यगृहात सध्या सुरू असलेली दुरुस्ती दीर्घकाळ लांबल्याने येथे होणारे करमणुकीचे विविध कार्यक्रम, नाटकांबरोबर एकांकिका स्पर्धासुद्धा रद्द होण्याची नामुष्की ओढविली आहे.
येथील श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे नाट्यगृहात गेल्या १८ वर्षांपासून नाट्यप्रयोग, करमणुकीचे विविध कार्यक्रम आणि त्याचबरोबर इचलकरंजी फेस्टिव्हल, विद्यालये-महाविद्यालयांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम होत आहेत. मनोरंजन मंडळाने तर गेली १६ वर्षे राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा घेत या क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. मात्र, नाट्यगृहाच्या दुरुस्तीच्या कारणास्तव प्रथमच ही एकांकिका स्पर्धा रद्द करावी लागली आहे.इचलकरंजी औद्योगिक शहर असल्याने येथे नाटके किंवा तत्सम प्रयोगांना फारसा प्रतिसाद मिळत नसला तरी श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात होणाऱ्या नाट्यप्रयोगामुळे एक प्रेक्षक वर्ग निर्माण झाला होता. अशा रसिकांची भूक भागविण्यासाठी कऱ्हाड, कोल्हापूर, सांगली व बेळगाव अशा दौऱ्यांवर येणाऱ्या नाटक कंपन्यांचे इचलकरंजीतील नाट्यगृहातही प्रयोग होत असत; पण गेले नऊ-दहा महिने नाट्यगृह बंद पडल्याने आता ही परंपरा खंडीत झाली आहे. अशा श्रीमंत घोरपडे नाट्यगृहातील खुर्च्या मोडलेल्या, स्वच्छतागृहे खराब, मंचावरील पडदे बदलण्याची आवश्यकता, आवाजाची यंत्रणा जुनी झाल्याने गेल्या दोन वर्षांपासून अवकळा आली होती. वास्तविक पाहता २० वर्षांपूर्वीच्या या बाबी किमान पाच-सहा वर्षांपूर्वी बदलणे आवश्यक होते. तरी त्या-त्यावेळच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर गेले वर्षभर नाट्यगृहाची स्थिती अत्यंत केविलवाणी झाली. म्हणून दुरुस्तीची निविदा मागविण्यात आली. सध्या नूतनीकरणाचे बरेचसे काम पार पडले असले तरी गेल्या दीड महिन्यांपासून पुन्हा ते रेंगाळले आहे. तसेच २० वर्षांपूर्वीची ध्वनी व्यवस्था बदलण्याची आवश्यकता असून, कोल्हापूर येथील देवल क्लबने ज्या पद्धतीने आधुनिक ध्वनी व्यवस्था चालू केली आहे, त्याप्रमाणे किंवा त्याहून चांगली ध्वनी व्यवस्था करावी, अशीही मागणी रसिक प्रेक्षकांची आहे. (प्रतिनिधी)
‘अर्थ’ शोधणाऱ्यांमुळे अवकळा
नाट्यगृह हे सांस्कृतिक कलागुणांचे सादरीकरण करणारे ठिकाण असून, तेथे संस्कृतीच्या ठेव्याची जपणूक होण्याबरोबर तो वृद्धिंगतही होतो; पण कामात ‘अर्थ’ शोधणाऱ्या लोकप्रतिनिधींना मात्र नाट्यगृहाच्या देखभाल-दुरुस्तीमध्ये फारशी रूची नाही. याचा परिणाम म्हणून नाट्यगृहाबरोबर नागरिकांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या उद्यानांनाही अवकळा आली आहे. परिणामी, नाट्यगृह व उद्यानांना ‘अरे मला कुणी वाली आहे का?’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
‘आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास’
नाट्यगृह व जलतरण तलाव यांना विजेचा पुरवठा करणाऱ्या रोहित्रामध्ये मांजर पडल्याने शॉर्टसर्किट होऊन रोहित्र नादुरुस्त झाले आहे. या रोहित्राची दुरुस्ती ताबडतोब करून दोन्हीकडील विद्युतपुरवठा पूर्ववत करण्याची आवश्यकता असतानासुद्धा त्यासाठी विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे ‘आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास’ अशी स्थिती झाली असल्याची चर्चा नागरिकांत आहे.
ओल्या पार्ट्यांचे केंद्र
नाट्यगृहाचे आवार प्रशस्त आहे. त्याठिकाणी असलेला हिरवळीचा परिसर (लॉन) आल्हाददायक आहे. मात्र, त्याच्या देखभालीसाठी असणारे राखणदार आणि स्वच्छता ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अत्यंत तोकडी आहे. परिणामी, नाट्यगृहाच्या परिसरात रात्री ओल्या पार्ट्या रंगत आहेत. त्यामुळे या परिसरास आणखीन अवकळा येऊ लागली आहे.