इचलकरंजीतील तिघेजण पानसरे हत्येप्रकरणी ताब्यात
By admin | Published: March 18, 2015 09:59 PM2015-03-18T21:59:04+5:302015-03-19T00:01:12+5:30
संशयास्पद दुचाकीचे कनेक्शन
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी इचलकरंजीतील तिघा सराईत गुन्हेगारांना बुधवारी दुपारी चौकशीसाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. पानसरे यांच्या हत्येचा तपास करीत असताना पोलिसांना स्प्लेंडर व पल्सर दुचाकी मिळाल्या आहेत. दुचाकींचे कनेक्शन या तिघा सराईत गुन्हेगारांशी असल्याचे तपासांत निष्पन्न झाल्याने त्यांच्याकडे रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.
आतापर्यंत चार संशयास्पद दुचाकी जप्त केल्या आहेत. त्यामधील स्प्लेंडर व पल्सरचे कनेक्शन इचलकरंजी येथील तिघा गुन्हेगारांशी असल्याचे प्राथमिक तपासांत निष्पन्न झाले आहे.
या गुन्हेगारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वीच ते जामिनावर बाहेर आले आहेत. पानसरे हत्येचा तपास करीत असताना संशयास्पद मिळून आलेल्या स्प्लेंडर व पल्सर या गुन्हेगारांच्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे तिघांना ताब्यात घेऊन पोलीस मुख्यालयात आणले. येथे पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा व अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली.