इचलकरंजीत महाविद्यालयाच्या प्रवेश फीवर चोरट्याचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:26 AM2021-08-23T04:26:26+5:302021-08-23T04:26:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील नामांकित श्रीमंत ना. बा. एज्युकेशन सोसायटीच्या व्यंकटेश महाविद्यालय, गोविंदराव ज्युनिअर कॉलेज, बालमंदिर व ...

Ichalkaranjit College Admission Fever Thief | इचलकरंजीत महाविद्यालयाच्या प्रवेश फीवर चोरट्याचा डल्ला

इचलकरंजीत महाविद्यालयाच्या प्रवेश फीवर चोरट्याचा डल्ला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : येथील नामांकित श्रीमंत ना. बा. एज्युकेशन सोसायटीच्या व्यंकटेश महाविद्यालय, गोविंदराव ज्युनिअर कॉलेज, बालमंदिर व विद्यामंदिरच्या ऑफिसमधील वीस तिजोरी फोडून अज्ञात चोरट्याने अंदाजे चार लाख १० हजारांवर डल्ला मारला. रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याची माहिती मिळताच गावभाग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ठसेतज्ञ्ज व श्वानपथकास पाचारण करून चोरट्याचा कसून तपास सुरू करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, शहरातील मध्यवस्तीत श्रीमंत ना. बा. एज्युकेशन सोसायटी संचलित अनेक शैक्षणिक संस्था कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना प्राथमिकपासून पदवीपर्यंतचे शिक्षण याठिकाणी दिले जाते. सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने विद्यार्थ्यांची या परिसरात मोठी वर्दळ सुरू आहे. शनिवारी (दि.२१) प्रवेश घेण्याचा शेवटचा दिवस व सोमवारी यादी प्रसिद्ध होणार असल्याने विद्यार्थ्यांकडून प्रवेश फीची रक्कम प्रत्येक विभागाच्या ऑफिसमध्ये जमा करण्यात आली होती. दरम्यान, शनिवारी रात्री दोनच्या सुमारास सोसायटीच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. त्यानंतर व्यंकटेश महाविद्यालय, गोविंदराव ज्युनिअर कॉलेज व बालमंदिर व विद्यामंदिरच्या ऑफिसमध्ये प्रवेश करून चोरट्याने जवळपास वीस तिजोरी फोडल्या. यातील अंदाजे चार लाख १० हजार रुपयांची रक्कम लंपास केली.

सकाळी शिपाई रवींद्र कांबळे यांनी ऑफिस उघडण्यासाठी आत प्रवेश केला असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. तत्काळ याची माहिती प्राचार्य विजय माने यांना देण्यात आली. त्यानंतर पोलीस विविध पथकासह घटनास्थळी दाखल होत पुढील तपास सुरू केला. या घटनेमुळे संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक व कर्मचारी आवारात थांबून होते.

चौकटी

चेहरा झाकल्याने ओळख पटण्यास अडचणी

विविध संस्थेच्या ऑफिसमध्ये प्रवेश करताना चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मात्र, त्याने तोंडावर कापड बांधल्यामुळे त्याची ओळख पटण्यास पोलिसांना अडचणी येत आहेत, तसेच काही परिसरातील वीज रात्रीच्या सुमारास बंद असल्याने तपास करणे पोलिसांसमोर आव्हान आहे.

श्वान संस्थेच्या आवारातच घुटमळले

चोरीच्या तपासासाठी पोलिसांनी श्वान पथकास पाचारण केले. श्वानाने संस्थेच्या भिंतीकडेने मार्ग काढत दोन चकरा घेत शेवटी मुख्य गेटपर्यंत पोहोचले. मात्र, त्यानंतर पुढे श्वानास मार्ग काढता आला नाही.

चोरट्याने संधीचा घेतला फायदा

कोरोना महामारीमुळे अद्याप शाळा सुरू करण्यात आल्या नाहीत. सध्या प्रवेश प्रक्रियेचे काम सुरू आहे. रविवार सुट्टी असल्याने संस्थेचे ऑफिस बंद होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्याने डाव साधला असल्याची चर्चा परिसरात सुरू होती.

फोटो ओळी

२२०८२०२१-आयसीएच-०१

इचलकरंजीत व्यंकटेश महाविद्यालय, गोविंदराव ज्युनिअर कॉलेज, बालमंदिर व विद्यामंदिरच्या ऑफिसमधील जवळपास वीस तिजोरी फोडून अज्ञात चोरट्याने रक्कम लंपास केली.

२२०८२०२१-आयसीएच-०२

घटनास्थळी ठसेतज्ज्ञांनी नमुने घेतले.

२२०८२०२१-आयसीएच-०३ ऑफिसच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने आत प्रवेश केला.

Web Title: Ichalkaranjit College Admission Fever Thief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.