इचलकरंजीत कोरोना सक्रिय, प्रभाग समिती निष्क्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:19 AM2021-06-02T04:19:17+5:302021-06-02T04:19:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहर व परिसरात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात पसरत असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहर व परिसरात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात पसरत असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्रभाग समिती पुन्हा कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, कोरोनाचा प्रसार वाढत असूनही इचलकरंजीत प्रभाग समिती अकार्यक्षम असल्याचे दिसत आहेत.
बाजाराचे नियोजन, कोरोनाबाधित नागरिकांचे अलगीकरण, प्रबोधन, सॅनिटायझेशन व प्रभागातील गोरगरिबांना अन्नधान्याची मदत अशा कामांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रभाग समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. शहरातील ३१ प्रभागांमध्ये नागरिक व प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी ३१ प्रभाग समित्यांची स्थापना केली होती. समितीमध्ये काही नगरसेवकांचे कार्यकर्ते, तर काही सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी होते.
गतवर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत प्रभाग समित्या स्वत:ला झोकून देऊन कार्य करत होते. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी मोठे सहकार्य लाभले होते. मात्र, सहा महिन्यांच्या कालावधीनंतर शहरातील कोरोनाचा प्रभाव ओसरत गेल्याने या समित्या शांत झाल्या. या समित्यांच्या सदस्यांना त्या काळात अनेक अडचणी येत होत्या. जीव धोक्यात घालून काम करत असतानाही नगरपालिका प्रशासनाने समित्यांच्या सदस्यांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्यातील कार्यक्षमता कमी होत गेली.
शहर व परिसरात कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुस-या लाटेत रुग्णांची संख्या अधिक आहे. तर प्रशासनाने कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचा इशारा दिला असून लहान मुलांना याचा धोका असल्याचे सांगितले आहे. या परिस्थितीचा विचार करता नगरपालिकेने कडक अंमलबजावणी करण्यासाठी प्रभाग समित्या पुन्हा कार्यान्वित करण्याची गरज असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.
चौकट
प्रभाग समितीत
प्रत्येक प्रभाग समितीमध्ये भागातील दोन नगरसेवक, दोन नगरपालिकेचे कर्मचारी व चार ते पाच सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश होता. सर्व ३१ प्रभागांमध्ये मिळून जवळपास १५० सामाजिक कार्यकर्ते प्रभाग समितीमध्ये होते. त्यांना प्राधान्याने लसही देण्यात आली नाही. तसेच लाट ओसरल्यावर प्रशासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, अशी भावना व्यक्त होत आहे.