इचलकरंजीत गॅस सिलिंडरचा स्फोट

By admin | Published: June 2, 2016 01:21 AM2016-06-02T01:21:22+5:302016-06-02T01:21:22+5:30

पाच जखमी : चालकाचा पाय निकामी; स्फोटामुळे परिसर हादरला

Ichalkaranjit Gas Cylinder Blast | इचलकरंजीत गॅस सिलिंडरचा स्फोट

इचलकरंजीत गॅस सिलिंडरचा स्फोट

Next

इचलकरंजी : येथे मालवाहतूक अ‍ॅपे रिक्षामध्ये असलेल्या कार्बनडायआॅक्साईड (सीओ-२) या सोडा तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट होऊन पाचजण जखमी झाले. यातील रिक्षाचालकाचा पाय तुटल्याने तो गंभीर जखमी आहे. बुधवारी भरदुपारी व्यंकटराव हायस्कूलसमोर असलेल्या सोडा पॉर्इंटच्या दुकानासमोर घडलेल्या या प्रकाराने भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेची नोंद गावभाग पोलिसांत झाली आहे.
प्र्रज्वल कानगोंडा पाटील (वय १८), गुरुनाथ नागाप्पा आळगी (१२), विनोद शिवचलआप्पा सलगर (१६), शंकर सांगाप्पा गिरगावे (१५, सर्व रा. जुना चंदूर रोड) (पान १ वरून) व अनुष्का अरुण लांडगे (९, रा. सुदर्शन चौक) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना पालिकेच्या आयजीएम रुग्णालयात मलमपट्टी करून अधिक उपचारासाठी विविध खासगी रुग्णालयांत दाखल करण्यात आले.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, व्यंकटराव हायस्कूलसमोर बाळकृष्ण आप्पासाहेब माने यांच्या मालकीच्या दुकानगाळ्यात आठ दिवसांपूर्वी अरुण लांडगे यांनी स्वामी समर्थ अनुष्का सोडा पॉर्इंट या नावाने सोडा विक्रीचा व्यवसाय सुरू केला. यासाठी लागणाऱ्या बाटल्या व सीओ-२ चे सिलिंडर आणण्यासाठी लांडगे यांनी अ‍ॅपेरिक्षा (एमएच ११ टी ८८६९) ठेवली आहे. या रिक्षात प्रज्वल पाटील हा चालक म्हणून काम करतो. बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास प्रज्वल पाटील रिक्षातून सिलिंडर व बाटल्या घेऊन दुकानासमोर आला. तेथे रिक्षा लावून तो रिक्षातील सिलिंडर काढत होता. यावेळी अचानक रिक्षातील सिलिंडरचा स्फोट झाला.
स्फोट एवढा गंभीर होता की, परिसरातील एक किलोमीटर अंतरापर्यंत मोठा आवाज पोहोचला. आवाजामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. वातावरण थोडे निवळल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. काही तरुणांनी जखमींना तत्काळ उपचारासाठी हलविले. यामध्ये रिक्षाचालक प्रज्वल याचा डावा पाय घोट्याच्या खालून निकामी झाला. स्फोटामध्ये अ‍ॅपेरिक्षा एका बाजूने फाटली, सिलिंडर फुटून त्याचे तुकडे झाले, काचा फुटल्या, गाडीतील सोड्याच्या बाटल्यांचे ट्रे व बाटल्या फुटून रस्त्यावर काचांचा खच पडला. सोडा दुकानासह बाजूच्या यश आॅप्टिकल या दुकानाच्या फलकाला सिलिंडरचा पुढील भाग जोरात धडकून रस्त्यावर पडला. त्यामुळे फलक फुटला. तसेच घरमालक माने यांच्या गाळ्यातील काचा फुटल्या. लगतच्या कॉम्प्युटर गेम झोन या दुकानामधील काचा फुटून कॉम्प्युटर बंद पडले. यासह एका नव्याने सुरू होणाऱ्या दुकानाचे किरकोळ नुकसान झाले. स्फोटामध्ये अ‍ॅपेरिक्षासह आजूबाजूच्या दुकानांचेही नुकसान झाले आहे. एकूण नुकसानीचा आकडा रात्री उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकला नाही. मात्र, अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच गावभाग पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. जमावाला बाजूला करत घटनास्थळाचा पंचनामा करून रस्त्यावर पसरलेल्या काचा, रिक्षा हलविण्यात आली. सिलिंडर फुटून स्फोट होण्याचे नेमके कारण काय, याचा पोलिस शोध घेत आहेत. (वार्ताहर)
घटनास्थळावरील दृश्य गंभीर
घटनास्थळावर फाटून पडलेला लोखंडी सिलिंडरचा पत्रा, रस्त्यावर पडलेला काचांचा खच, मोडलेली अ‍ॅपेरिक्षा, आजूबाजूच्या दुकानांतील काचा फुटून झालेले नुकसान हे चित्र पाहिल्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात येत होते.

स्फोटामुळे अन्य सोडा सेंटर दुकानदारांत भीतीचे वातावरण
शहरात सोडा सेंटरचा व्यवसाय चांगला चालत असल्याचे समजताच या हंगामात अशा सोडा सेंटरचे अनेक ठिकाणी पेव फुटले. सगळेच सोडा सेंटर दुकानदार अशा सिलिंडरचा वापर करतात. या स्फोटामुळे दुकानदारांत भीतीचे वातावरण पसरले होते. अनेक दुकानदारांनी घटनास्थळी भेट दिली.

 

Web Title: Ichalkaranjit Gas Cylinder Blast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.