इचलकरंजीत शिवसेनेचा मोर्चा

By admin | Published: June 19, 2016 01:13 AM2016-06-19T01:13:03+5:302016-06-19T01:13:03+5:30

प्रशासनाचा शंखध्वनीने निषेध : डेंग्यू मृतांच्या नातेवाइकांना तीन लाख देण्याची मागणी

Ichalkaranjit Shivsena's Front | इचलकरंजीत शिवसेनेचा मोर्चा

इचलकरंजीत शिवसेनेचा मोर्चा

Next

इचलकरंजी : नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डेंग्यूचा फैलाव वाढत आहे. डेंग्यूमुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना नगरपालिका प्रशासनाने प्रत्येकी तीन लाख रुपये द्यावेत, यासह नागरी सुविधांच्या मागण्यांसाठी शनिवारी इचलकरंजी शहर शिवसेनेच्यावतीने पालिकेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी पालिकेच्या प्रवेशद्वारात आणि नगराध्यक्षांच्या दालनात शंखध्वनी करण्यात आला.
शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून, डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. डेंग्यूमुळे तिघांचा मृत्यू झाला असून, त्याला प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेच्यावतीने करण्यात आला. मोर्चाच्या सुरुवातीला प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करीत शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
रॅली पालिकेत आल्यानंतर प्रवेशद्वारात निषेधाच्या घोषणा देत प्रशासनाच्या नावाने शंखध्वनी करण्यात आला.
त्यानंतर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, शहरप्रमुख धनाजी मोरे, मलकारी लवटे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांना निवेदन सादर केले. यावेळी झालेल्या चर्चेत महादेव गौड आणि आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.
नगराध्यक्षा बिरंजे यांनी, मृतांच्या वारसांना अनुदानसंदर्भात पालिकेने ठराव करून तो शासनाकडे पाठविला आहे, त्याचबरोबर पालिकेच्या माध्यमातून काय मदत करता येईल, यासंदर्भात पालिकेत सभेत निर्णय करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले. या आंदोलनात सयाजी चव्हाण, महेश बोहरा, आप्पासो पाटील, राजू आलासे, आदींसह शिवसैनिक सहभागी झाले होते. (वार्ताहर)

Web Title: Ichalkaranjit Shivsena's Front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.