इचलकरंजीत पाण्यासाठी आंदोलन

By admin | Published: April 21, 2016 12:57 AM2016-04-21T00:57:31+5:302016-04-21T00:57:31+5:30

टाळे ठोकले : जलअभियंता धारेवर, नागरिकांनी कर्मचाऱ्यांना कोंडले

Ichalkaranjit water for the movement | इचलकरंजीत पाण्यासाठी आंदोलन

इचलकरंजीत पाण्यासाठी आंदोलन

Next

इचलकरंजी : चार महिन्यांपासून कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत असून, पालिका प्रशासनाला कळवूनही त्याकडे दुर्लक्षच केले जात आहे. या कारणावरून मुरदुंडे मळा व कलानगर परिसरातील नागरिकांनी नगरसेवक महादेव गौड यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा विभागाला बुधवारी टाळे ठोकले. दरम्यान, नगराध्यक्षांच्या दालनातील चर्चेवेळी संतप्त नागरिकांनी जलअभियंता ए. एन. जकीनकर यांना धारेवर धरले. दोन दिवसांत भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलक माघारी परतले.
प्रभाग क्रमांक १२ मधील मुरदुंडे मळा, गल्ली नं. १ परिसरात चार महिन्यांपासून पाणीच येत नाही. तर कलानगर भागात दोन महिन्यांपासून अत्यंत कमी दाबाने पाणी येत आहे. यासंदर्भात पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या; पण परिस्थिती तशीच आहे. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी ठिकठिकाणी खुदाई केली आहे; पण चूक कोठे , हेच अधिकारी व कर्मचाऱ्यांना समजत नाही.
संतप्त नागरिकांनी पालिकेवर नगरसेवक महादैव गौड यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना कोंडून घालून दरवाजाला टाळे ठोकले. सर्वांनी पाणीपुरवठा विभागाच्या दारात ठिय्या मारत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. सुमारे १५ मिनिटांच्या आंदोलनानंतर नगराध्यक्षांच्या दालनात सर्वांना बोलविले. तेथे नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे, उपनगराध्यक्ष महावीर जैन, अजितमामा जाधव, पाणीपुरवठा सभापती दिलीप झोळ, अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार, जलअभियंता ए. एन. जकीनकर उपस्थित होते. महादेव गौड यांनी परिस्थितीची माहिती देत नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असून, अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता दूरध्वनी बंद तरी असतात किंवा दोन दिवसांत काम करतो, अशी उत्तरे दिल्याचे सांगितले. यावेळी संतप्त नागरिकांनी जकीनकर यांना चांगलेच धारेवर धरले, यामुळे दालनात गोंधळ निर्माण झाला . अखेर चर्चेअंती दोन दिवसांत भागातील पाणीपुरवठा सुरळीत सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात सुरेश भुते, हणमंत वाळवेकर, शशिकांत राक्षे, जितेंद्र जानवेकर, वसंत तोडकर, विद्याधर पवार, पंडित वाळवेकर, सुभाष बंडगर, दीपक बंडगर, राजू पवार, शारदा डंबाळ, मंगल भंडारे, शोभा तेजम, विद्या पवार, वैशाली मांगलेकर, ज्योती डांगरे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.
काहीच पदरी पडत नसल्याने नागरिक संतप्त
पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याने एका भागात मुबलक पाणी, तर एका भागात पाणीच येत नाही. शिवाय भागातील कूपनलिका बंद पडल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. कामासंदर्भात चौकशी करता आश्वासनाशिवाय काहीच पदरी पडत नसल्याने नागरिक संतप्त झाले.

Web Title: Ichalkaranjit water for the movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.