इचलकरंजीत पंचगंगेच्या पुराचे पाणी पात्राबाहेर
By admin | Published: July 23, 2014 10:06 PM2014-07-23T22:06:27+5:302014-07-23T22:32:50+5:30
नदीकाठावरील मंदिरे व स्मशानभूमीला पाण्याचा विळखा
इचलकरंजी : जिल्ह्याच्या पश्चिम भागात होणाऱ्या जोरदार पावसामुळे येथील पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम डोंगराळ परिसरामध्ये गेले काही दिवस जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे पंचगंगा नदीस पूर आला असून, येथे पुराच्या पाण्याने पात्र ओलांडले आहे. नदीकाठावरील शेती पाण्याखाली गेली असून, गणेश मंदिर, महादेव मंदिर आणि स्मशानभूमीला पुराच्या पाण्याने विळखा घातला आहे. शहर आणि परिसरामध्ये गेले दोन दिवस पावसाच्या सरी जोरदारपणे कोसळत आहेत. त्यामुळे बळिराजा सुखावला आहे. सध्याच्या ऊस व खरीप पिकासाठी अत्यंत उपयुक्त असा पाऊस बरसत असल्याने उत्साहाचे वातावरण पसरले आहे. (प्रतिनिधी)
कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर पाणी
येलूर येथे पाण्यातूनच वाहतूक : मलकापूर, खोतवाडी, बर्की, पेरीड बंधारे पाण्याखाली
मलकापूर : शाहूवाडी तालुक्यात मुसळधार पावसामुळे कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील येलूर येथे रस्त्यावर पाणी आल्याने त्यातूनच वाहतूक सुरू आहे; तर कोळगाव-पणुंद्रे, करंजफेण रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद आहे. मलकापूर, खोतवाडी, बर्की, पेरीड बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तालुक्यात ११९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मलकापूर-कोकरूड मार्गावरील झाडे वाऱ्याने उन्मळून पडली आहेत.
गेले दोन दिवस मलकापूर, आंबा, करंजफेण, उदगिरी, शित्तूर-वारुण, येळवण जुगाई परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. वारणा, कडवी, शाळी, आंबार्डी नद्यांना पूर आला आहे. वादळी वारे व पावसामुळे तालुक्यातील कांटे, रेठरे, गोंडोली, परळे निनाई, आकुर्ळे, माण, उचत, परखंदळे, आदी गावांत घरे पडली आहेत; तर पणुंद्रे, टेकोली, आदी बारा वाड्यांचा शाहूवाडीशी संपर्क तुटला आहे.
तालुक्यातील पाच बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कडवेपैकी मोरेवाडी येथील वृद्धा हौसाबाई गणपती भालेकर या ओढ्याच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी जीवरक्षक दिनकर कांबळे यांना पाचारण करण्यात आले.
राधानगरी धरणातून विसर्ग वाढविला
राधानगरी : राधानगरी परिसरात पावसाची संततधार सुरूच आहे. धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग ६०० क्युसेक्सने वाढविला आहे. भोगावती नदीला पूर आला असून, तालुक्यातील अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
तारेवाडी-हडलगे बंधारा पाण्याखाली
नेसरी : तारेवाडी-हडलगे बंधारा आज पाण्याखाली गेला. सायंकाळपर्यंत बंधाऱ्यावर एक फुटाच्या वर पाणी आले होते. रात्रभर पावसाचा जोर कायम राहिल्यास नेसरी-बेळगाव मार्गावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे. कानडेवाडी बंधारा मात्र अजून पाण्याखाली आलेला नाही. त्यामुळे पर्यायी वाहतूक कानडेवाडी-तावरेवाडी-सांबरे मार्गे होईल. आज नेसरीतील सर्व शाळांनी मात्र नदीपलीकडील गावांमधील विद्यार्थ्यांना घरी लवकर पाठवले.