इचलकरंजीत मंदिरे हटविली
By admin | Published: May 14, 2016 01:34 AM2016-05-14T01:34:41+5:302016-05-14T01:34:41+5:30
२००९ नंतरची मंदिरे : काही ठिकाणी विरोध; दिवसभर नगरपालिकेची ‘नॉन स्टॉप’ मोहीम
इचलकरंजी : शहरात विविध ठिकाणी असलेली सन २००९ नंतरची १५ धार्मिक स्थळे शुक्रवारी नगरपालिकेने पोलिस बंदोबस्तात काढली. दरम्यान, लालनगर व आवाडे सबस्टेशनजवळील शेळके मळा येथे मंदिरे हटविताना नागरिकांनी विरोध केला. तर काही ठिकाणी नागरिकांनी स्वत:हून धार्मिक स्थळे काढून घेतली.
सर्वोच्च न्यायालयाने सन २००९ नंतर सार्वजनिक ठिकाणी बांधण्यात आलेली धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे इचलकरंजी नगरपालिकेने शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये एकूण १२८ पैकी १६ मंदिरे सन २००९ नंतरची असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ही १६ मंदिरे निष्कासित करण्याचा अहवाल तयार केला होता. त्यासंदर्भात नगरपालिकेमध्ये सुनावणी घेण्यात आली होती. या सुनावणीनंतर १६ मंदिरे हटविण्याचे पालिकेकडून जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी सकाळपासून नगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने पोलीस बंदोबस्तासह मंदिरे हटविण्याची मोहीम हाती घेतली. या मोहिमेत मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार, नगरअभियंता भाऊसाहेब पाटील, शिवाजी जगताप, संजय बागडे, विजय पाटील, आदींसह अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. पथकाने दिवसभर सलग कारवाई करत १५ मंदिरे हटविली. यामध्ये मंदिरातील देवांची मूर्ती संबंधितांकडे देऊन मंदिरे जेसीबी मशीनने जमीनदोस्त करण्यात आली. आवाडे सबस्टेशन जवळील मंदिर व लालनगर येथील मंदिर हटविताना परिसरातील नागरिकांनी विरोध केला. मंदिरासमोर ठिय्या मारून मंदिर हटवू देणार नाही, अशी भूमिका घेतली. यावेळी पोलिस बळाचा वापर करीत नागरिकांना बाजूला करत पालिकेने मंदिरे हटविली. काही ठिकाणी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मंदिर शेजारच्या जागेत हलविण्याची आश्वासने देत कारवाई केली. दिवसभरात १५ मंदिरे हटविण्यात आली असून, शिवाजीनगर परिसरातील एक मंदिर राहिले आहे. ते आज, शनिवारी हटविण्यात येणार असल्याचे अतिरिक्त मुख्याधिकारी पोतदार यांनी सांगितले. (वार्ताहर)