इचलकरंजीत ‘वास्तू २०१५’चे शानदार उद्घाटन
By admin | Published: May 3, 2015 01:01 AM2015-05-03T01:01:20+5:302015-05-03T01:01:20+5:30
८० स्टॉल्स उपलब्ध : बांधकाममंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम
इचलकरंजी : येथील ‘वास्तू २०१५’ या बांधकामविषयक प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे सहकार व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे होते. आमदार सुरेश हाळवणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. ४ मे पर्यंत हे प्रदर्शन चालणार असून, यामध्ये ८० हून अधिक स्टॉल उपलब्ध आहेत.
क्रेडाई इचलकरंजी, असोसिएशन आॅफ इंजिनिअरिंग अॅण्ड आर्किटेक्ट, सिमेंट डिलर्स असोसिएशन, बिल्डर्स असोसिएशन, बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स असोसिएशन आणि बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन आॅफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील हुलगेश्वरी मिल कंपौंडमध्ये हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे प्रायोजक ट्रोजन प्लायवूड विनायक मार्केटिंग कंपनी व भारत स्टील इंडस्ट्रीज, सिद्धनाथ रेडिमिक्स प्रा.लि., कजारिया टाईल्स, जे. के. सुपर सिमेंट, पुण्य पर्व आणि रामसिन्हा ग्रुप हे आहेत.
कार्यक्रमात ‘वास्तू २०१५’चे अध्यक्ष रमेश मर्दा यांनी स्वागत केले. क्रेडाईचे अध्यक्ष नितीन धूत यांनी प्रास्ताविक केले. यामध्ये बांधकामविषयक सद्य:स्थिती, भावी संकल्पना, शहर व परिसरात वीसहून अधिक सुरू असलेले गृह प्रकल्प, त्यांच्या योजना याची माहिती देऊन प्रदर्शनात आधुनिक यंत्रसामग्री, इलेक्ट्रिक किचन वेअर यासह बांधकामसंबंधी सर्व आवश्यक साहित्यांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. दरम्यान, ‘क्रेडाई है तो भरोसा है’ या मुखपत्राचे, तसेच इंजिनिअरिंग अॅण्ड आर्किटेक्ट असोसिएशनच्या डायरीचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर आमदार सुरेश हाळवणकर व माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आदींची भाषणे झाली. यावेळी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे, ललित गांधी, अनिल डाळ्या, सतीश डाळ्या, जहीर सौदागर, सय्यद गफारी, संजय रुग्गे, आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)