‘आयडीबीआय’च्या जयंत गंधेंच्या विरोधात पुरावे-‘आयडीबीआय’ आठ कोटी गैरव्यवहार प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 12:17 PM2018-11-26T12:17:46+5:302018-11-26T12:19:01+5:30
शासनाची पीक व पाईपलाईन कर्जयोजना मंजूर करण्यासाठी ४०० लाभार्थ्यांचे खोटे सातबारा व ‘आठ अ’ उतारे सादर करून वरणगे (ता. करवीर) येथील आयडीबीआय बँकेच्या शाखेला सुमारे आठ कोटी रुपयांचा गंडा
कोल्हापूर : शासनाची पीक व पाईपलाईन कर्जयोजना मंजूर करण्यासाठी ४०० लाभार्थ्यांचे खोटे सातबारा व ‘आठ अ’ उतारे सादर करून वरणगे (ता. करवीर) येथील आयडीबीआय बँकेच्या शाखेला सुमारे आठ कोटी रुपयांचा गंडा घातल्याच्या प्रकरणात बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक जयंत गंधे (रा. कोल्हापूर) हे संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांच्याविरोधात पुरावे हाती लागले असून, येत्या दोन दिवसांत पोलिसांनी त्यांना फसवणुकीच्या गुन्ह्यात आरोपी करून अटक करण्याची तयारी केली आहे. या प्रकरणातील वकीलही संशयाच्या फेºयात अडकले आहेत. त्यांनाही अटक होण्याची दाट शक्यता आहे.
वरणगे (ता. करवीर) येथील आयडीबीआय बँक गैरव्यवहारप्रकरणी तत्कालीन व्यवस्थापक गंधे यांच्याकडे पोलीस कसून चौकशी करीत आहेत. ४०० बोगस कर्जप्रकरणे गंधे यांच्या सहीने मंजूर केली आहेत. फसवणुकीचा आकडा आठ कोटी असल्याने बँकेच्या मुंबईतील मुख्य शाखेने गंधे यांची खातेनिहाय चौकशी सुरू केली आहे. गंधे यांनी कोणते निकष पाहून कर्जप्रकरणे मंजूर केली? हा प्रकार त्यांच्या लक्षात कसा आला नाही? त्यांच्या निष्काळजीपणामुळे बँकेला आठ कोटींचा फटका बसला आहे, आदी मुद्द्यांवर चौकशी केली. पोलिसांच्या तपासामध्ये गंधे यांच्या विरोधात पुरावे हाती लागले आहेत. बँकेने नियुक्त केलेल्या वकिलांकडून सर्व प्रकरणांचे सर्च रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर प्रकरणे मंजूर केली असल्याचा जबाब गंधे यांनी दिला आहे; त्यामुळे पोलिसांनी वकिलांचीही चौकशी केली आहे. हे दोघेही आरोपींच्या पिंजºयात सापडले आहेत. येत्या दोन दिवसांत कायदेतज्ज्ञांच्या मदतीने त्यांना आरोपी करून अटक करण्याची हालचाल सुरू आहे.