शिवस्मारकासाठी जनतेतून निधी संकलनाचा विचार

By admin | Published: December 26, 2016 12:56 AM2016-12-26T00:56:39+5:302016-12-26T00:56:39+5:30

चंद्रकांतदादा : आपला सहभाग आहे ही भावना महत्त्वाची

The idea of ​​fundraising from the people for Shivsamarkar | शिवस्मारकासाठी जनतेतून निधी संकलनाचा विचार

शिवस्मारकासाठी जनतेतून निधी संकलनाचा विचार

Next

कोल्हापूर : अरबी समुद्रातील भव्य शिवस्मारकाच्या उभारणीमध्ये आपलाही वाटा आहे, अशी भावना निर्माण व्हावी यासाठी जनतेतून निधी संकलन करण्याचा विचार असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी येथे एका कार्यक्रमामध्ये बोलताना सांगितले.
शनिवारी (दि. २४) मुंबईजवळ अतिशय दिमाखदार पद्धतीने शिवछत्रपतींच्या स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. सार्वजनिक बांधकाममंत्री म्हणून या कार्यक्रमाचे बहुतांशी नियोजन चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडेच होते. राज्यातील क्रमांक दोनचे पद असणारे महसूलमंत्रिपदही त्यांच्याकडे आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना पाटील यांनी ही माहिती दिली.
पाटील म्हणाले, गावागावांतून या स्मारकासाठी नद्यांचे पाणी आणि गड-किल्ल्यांवरील माती आणली गेली. ती एवढ्यासाठीच की आपलाही या भूमिपूजनामध्ये सहभाग आहे अशी भावना निर्माण व्हावी. या स्मारकासाठी ३४०० कोटी रुपये खर्च येणार आहे. या स्मारक उभारणीमध्ये आपलाही खारीचा वाटा आहे, अशी भावना होण्यासाठी जनतेतूनही निधी संकलन करण्यात येईल. मात्र, ते मुख्यमंत्री निधीमध्ये जमा करायचे की कसे याबाबत अजून काही निश्चित ठरवलेले नाही.
मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेची शक्यता
येत्या तीन वर्षांत स्मारकाचे काम पूर्ण करावयाचे आहे. त्यासाठी निधी शासन कमी पडून देणार नाही हे वास्तव आहे; परंतु ज्या पद्धतीने माती आणि पाणी संकलित करण्यासाठी राज्यभर वातावरण तयार केले गेले त्याच पद्धतीने राज्यातील नागरिकांमध्ये या स्मारकासाठी उत्स्फूर्तपणे देणगी देण्याची ऊर्मी निर्माण व्हावी यासाठी ही योजना पुढे आल्याचे मानले जाते. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा होऊन याबाबत नेमका निर्णय होण्याची शक्यता आहे.

Web Title: The idea of ​​fundraising from the people for Shivsamarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.