गरजूंना मोबाईल देण्याचा विचार : हसन मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:13 AM2020-12-28T04:13:16+5:302020-12-28T04:13:16+5:30
उत्तूर : कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आला नाही तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून गरजू विद्यार्थ्यांना ...
उत्तूर : कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आला नाही तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून गरजू विद्यार्थ्यांना मोबाईल देण्याचा शासन विचार करीत आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
उत्तूर (ता. आजरा) येथे विघ्नहर्ता पतसंस्थेतर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सभापती उदय पवार होते.
मुश्रीफ म्हणाले, कोरोनामुळे शाळा बंद आहेत. मात्र, शिक्षण चालू आहे. प्राथमिक शाळेतील मुलेही कोरोनामुळे शाळेत जाऊ शकली नाहीत. कोरोना संसर्ग वाढला तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून गरजू विद्यार्थ्यांना मोबाईल देण्याचे नियोजन आहे. शिक्षकांनी प्रभावीपणे अध्यापन करण्यासाठी प्रयत्न करावेत.
मुश्रीफ यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा गौरव करण्यात झाला.
अध्यक्ष धनाजी रावण यांनी स्वागत केले. वसंतराव धुरे, काशिनाथ तेली, सभापती पवार यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास महादेव पाटील, रावसाहेब देसाई, रवींद्र पाटील, शिरीष देसाई, संतोष गुरव आदींसह संचालक व सभासद उपस्थित होते.
----------------------
फोटो ओळी : उत्तूर (ता. आजरा) येथे विघ्नहर्ता पतसंस्थेच्या गुणगौरव कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी धनाजी रावण, काशिनाथ तेली, वसंतराव धुरे आदी उपस्थित होते.
क्रमांक : २७१२२०२०-गड-०१