स्त्री-पुरुषांच्या कप्पेबंद संकल्पना बदलायला हव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 12:48 AM2018-02-09T00:48:44+5:302018-02-09T00:48:52+5:30

स्त्रियांवर होणाºया अत्याचाराचे मूळ शोधले तर त्यामागे पुरुषसत्ताक मानसिकता असल्याचे दिसून येते. त्यामुळे या विरोधात लढायचे तर पुरुषांनी पुढाकार घेतला पाहिजे.

The idea of ​​men and women should change | स्त्री-पुरुषांच्या कप्पेबंद संकल्पना बदलायला हव्यात

स्त्री-पुरुषांच्या कप्पेबंद संकल्पना बदलायला हव्यात

Next

स्त्रियांवर होणाºया अत्याचाराचे मूळ शोधले तर त्यामागे पुरुषसत्ताक मानसिकता असल्याचे दिसून येते. त्यामुळे या विरोधात लढायचे तर पुरुषांनी पुढाकार घेतला पाहिजे. या विचारातून सुरू झाली मेन अगेन्स्ट व्हायलन्स अ‍ॅन्ड अ‍ॅब्युस (मावा) ही संस्था. गेल्या २५ वर्षांपासून महिला, तृतीयपंथी, समलिंगी, उभयलिंगी अशा विविध विषयांवर संवेदनशील समाजमन घडविणाºया या संस्थेचे संचालक हरिष सदानी यांच्याशी साधलेला हा थेट संवाद..

महिला, मुलींवरील अन्याय कमी करायचा असेल तर पुरुषांची मानसिकता बदलली पाहिजे.

प्रश्न : मावा संस्थेच्या स्थापनामागील उद्दिष्ट्य काय?
उत्तर : मावा ही स्त्रिया, मुलींसाठी काम करणारी देशातील पहिली अशी संस्था आहे जी संवेदनशील पुरुषांनी सुरू केली आहे. ही संस्था युवकांशी मैत्रीपूर्ण वातावरणात संवाद साधते. त्यातून त्यांची मानसिकता जाणून घेण्याची आणि अपेक्षित परिवर्तन करण्यासाठी कृती कार्यक्रम राबविते. या युवकांनी आपल्या कुटुंबातील स्त्रियांना सन्मानाची वागणूक देऊन त्यांना सक्षम केले तरी संस्थेचा हेतू सफल होतो आणि आम्हाला आनंद आहे की गेल्या २५ वर्षांत आम्ही हे करू शकलो.

प्रश्न : संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात स्त्रियांच्या सामाजिक स्थितीबद्दल काय निष्कर्ष निघाला?
उत्तर : मी स्वत: ज्या ठिकाणी वाढलो परिसरात मी भोवतीने महिलांना मारहाण, असभ्य वर्तन, शिवीगाळ या सगळ््या गोष्टी पाहिल्या आहेत. त्यातून मी अंतमुर्ख होऊन विचार करू लागलो. आपल्याकडे स्त्रिया, मुलींवरील अन्याय, कौटुंबिक छळ या गोष्टींकडे त्यांचा वैयक्तिक प्रश्न किंवा महिलांचेच प्रश्न या दृष्टिकोनातून पाहिले जाते. पुरुषाने कुटुंबातील स्त्रीला कामात मदत केली, रडला तरी ‘बाईसारखं काय वागतोस,’ अशा शब्दांत हिणविले जाते. मग बाईच्या कामाला मोल नाही का, असा प्रश्न पडतो. आता ही परिस्थिती बदलत असली तरी अजून खूप मोठा पल्ला गाठणे बाकी आहे. आता तृतीयपंथी, समलिंगी, उभयलिंगी अशा व्यक्तींचे प्रश्न नव्याने निर्माण झाले आहेत त्यांना समाजापासून दूर करण्यापेक्षा समजून घेतले पाहिजे.

प्रश्न : ‘मावा’चे काम कशा पद्धतीने चालते?
उत्तर : महिला, मुलींवरील अन्याय कमी करायचा असेल तर पुरुषांची मानसिकता बदलली पाहिजे. त्याची सुरुवात म्हणून महाविद्यालयांपासून आम्ही सुरुवात केली. पुण्यातील सहा महाविद्यालयांमध्ये चर्चात्मक कार्यक्रमातून संवादक घडविले गेले. हे संवादक ज्युनिअर मुलांना प्रशिक्षण देऊ लागले. पथनाट्य, खेळ, गाणी या माध्यमातून हलके-फुलके मनोरंजन करीत युवकांची मानसिकता बदलली जाते. युवामैत्री ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली. त्यात मुलेच नव्हे, तर मुलीसुद्धा आपल्या अडचणी सांगून सल्ला विचारत होत्या. या सगळ्या नियोजनाचे काम आठ ते दहा पुरुषांची कोअर टीम करते. सध्या मुंबई युवा संवाद, जळगाव, धुळे येथे युवा तरंग, सातारा, कोल्हापूर, नागपूर, बुलढाणा येथे ‘माणूश’ नावाने हा उपक्रम चालविला जातो. ‘समभाव’ चित्रपट महोत्सव त्याचाच एक भाग आहे. संवादी गुंतवणूक असे त्याचे स्वरूप आहे. ‘पुरुष स्पंदन’ या दिवाळी अंकात पुरुष आपल्या अनुभवावर आधारित लेखन करतात. आता तर त्या स्त्रीयाही लिहू लागल्या आहेत. त्यात दरवर्षी विशेष थीमवर लेखन मागविले जाते.

प्रश्न : संस्थेच्या कामाचे फलित काय जाणवते?
उत्तर : युवा मैत्री उपक्रमातून आम्ही आजवर सातशे संवादक निर्माण केलो. याची दखल हार्वर्ड युनिव्हर्सिटीनेदेखील घेतली आणि त्यांना या संवादकांमधील गुणात्मक चाचणी आणि सर्वेक्षण केले. त्यात युवकांशी तारुण्यसुलभ पद्धतीने संवाद साधला तर बदल घडतो हे दिसून आले. मुलं-मुली आपल्या कुटुंबापासून बदलाची प्रक्रिया सुरू करताहेत, या विषयावर खुलेपणाने चर्चा करीत आहेत. घरात होत असलेल्या अन्यायाविरोधात पाऊल उचलताहेत आणि नवे संवादक घडवत आहेत. बदल ही सातत्याने होणारी गोष्ट आहे आणि आम्ही ते ठेवू शकलो याचे समाधान आहे.

प्रश्न : यानिमित्ताने युवक-युवतींना काही आवाहन करू इच्छिता?
उत्तर : आता मुली सक्षम झाल्या असल्या तरी मुलांमध्ये आणि पुरुषांमध्ये संकुचितपणा आणि असुरक्षिततेची भावना आहे. त्यांचा एक पाय २१ व्या शतकात, तर दुसरा पाय १७ व्या शतकात आहे. त्यांच्या मनातील स्त्रीविषयक पूर्वग्रहदूषित विचार बदलले पाहिजे. स्त्री, पुरुष अशा लिंगभेदाच्या कप्पेबंद चौकटीपलीकडे जाऊन आता व्यक्तिस्वातंत्र्य म्हणून विचार केला गेला पाहिजे. मुलीच्या नकारापासून ते कुटुंबातल्या स्त्रीवरील लहान-मोठ्या मानसिक व शारीरिक अन्यायाविरोधात सम्यकदृष्टीने मी पुरुष म्हणून कसा वागलो पाहिजे याचा विचार केला तर प्रश्न आपोआप सुटतील.
- इंदुमती गणेश

Web Title: The idea of ​​men and women should change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.