विचार, भूमिकेवर निवडणुका व्हायच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:03 AM2019-04-19T00:03:56+5:302019-04-19T00:04:01+5:30

माझ्या विद्यार्थिदशेपासून १९५२ नंतर मी राजकारणामध्ये सक्रिय आहे. सदाशिव मंडलिक, व्ही. बी. पोवार, अशोक पोवार हे माझ्यासोबतचे कार्यकर्ते. आम्ही ...

Ideas, Elections on the Role | विचार, भूमिकेवर निवडणुका व्हायच्या

विचार, भूमिकेवर निवडणुका व्हायच्या

Next

माझ्या विद्यार्थिदशेपासून १९५२ नंतर मी राजकारणामध्ये सक्रिय आहे. सदाशिव मंडलिक, व्ही. बी. पोवार, अशोक पोवार हे माझ्यासोबतचे कार्यकर्ते. आम्ही सुरुवातीला शेतकरी कामगार पक्षाचे काम करीत होतो. नंतर कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला.
मात्र, त्यावेळी पक्षाची भूमिका आणि उमेदवाराचे वैयक्तिक चारित्र्य, विचार यांचा विचार करून उमेदवारी दिली जात असे आणि मतदानही होत असे. आता परिस्थिती बदलली आहे. गुणवान माणसापेक्षा धनवान माणसाला उमेदवारीची संधी अधिक असल्याचे चित्र पाहावयास मिळते.
कॉँग्रेसमध्ये एकदा का उमेदवारी पक्षाने निश्चित केली की, मग जिल्हा पातळीवर मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक व्हायची. त्यावेळी नेते पक्षाशी आणि कार्यकर्ते नेत्याशी एकनिष्ठ होते. त्यामुळे या बैठकीत एकदा प्रचाराचे नियोजन ठरले की, तालुका पातळीवरील नेते त्याची जबाबदारी घ्यायचे. उमेदवार आणि आम्ही प्रमुख कार्यकर्ते प्रचाराला जायचो. मोठ्या गावांतून प्रचार फेऱ्या निघायच्या. सभा व्हायच्या. कार्यकर्त्यांच्याच घरी जेवणाची सोय केली जायची; कारण हॉटेल्स, खानावळी मोजक्या असायच्या आणि मुळात रोख पैसे जवळ फार नसायचेच. अनेक वेळा आम्ही घरच्या भाकरी बांधून प्रचाराला गेलो आहोत. बैलगाडीतून प्रचाराला गेलो आहोत. मुळात कार्यकर्त्यांना जनतेमध्ये सन्मान होता. बºयापैकी प्रचार जीपमधून व्हायचा. अ‍ॅम्बॅसडर गाडीमध्ये बसायला मिळणे भाग्याचे वाटत असे.
शंकरराव माने, व्ही. टी. पाटील, भाऊसाहेब महागावकर, शंकरराव डिगे यांच्यापासून ते उदयसिंगराव गायकवाड यांच्यापर्यंतच्या अनेक निवडणुकींत मी सक्रिय होतो. मात्र, २००० नंतर झालेल्या लोकसभा निवडणुकांचे स्वरूपच पालटून गेले आहे.
वैयक्तिक उमेदवार कसा आहे, तो कोणत्या पक्षाचा आहे, यापेक्षा राष्ट्रीय नेतृत्वाच्या लाटेवर विजयी होण्याचे दिवस आता आले आहेत. ‘ढाबा संस्कृती’ आता बळावली आहे. त्या कालावधीत आम्ही यशवंतराव चव्हाण, केशवराव जेधे, शंकरराव मोरे, ना. ग. गोरे, एस. एम. जोशी, कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांची प्रभावी भाषणे ऐकण्याची संधी आम्हांला मिळाली. या नेत्यांच्या भाषणांमध्ये अजिबात वैयक्तिक टीका नसायची. पक्षाच्या ध्येयधोरणावरच टीकाटिप्पणी केली जायची. त्यामुळे एका विधायक वातावरणामध्ये निवडणुका व्हायच्या. ही परिस्थिती आता राहिलेली नाही, याचे वैषम्य वाटते.

दादासाहेब जगताप

Web Title: Ideas, Elections on the Role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.