अंबाबाईची मूर्ती सुस्थितीत-पुरातत्व खात्याकडून मूर्ती व मंदिर परिसराची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:26 AM2021-01-19T04:26:32+5:302021-01-19T04:26:32+5:30

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीची कोणतीही झीज झालेली नसून ती सुस्थितीत आहे, असा निर्वाळा भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे ...

Idol of Ambabai in good condition - Inspection of idols and temple premises by Archaeological Department | अंबाबाईची मूर्ती सुस्थितीत-पुरातत्व खात्याकडून मूर्ती व मंदिर परिसराची पाहणी

अंबाबाईची मूर्ती सुस्थितीत-पुरातत्व खात्याकडून मूर्ती व मंदिर परिसराची पाहणी

Next

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीची कोणतीही झीज झालेली नसून ती सुस्थितीत आहे, असा निर्वाळा भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे उपाधीक्षक श्रीकांत मिश्रा यांनी दिला. महाकाली आणि महासरस्वतीच्या मूर्तीचे कॉन्झर्व्हेशन करणे गरजेचे असून मंदिरावरील धोकादायक कोबा काढण्यासाठीचा तसेच अन्य विकासकामांचा प्रस्ताव पाठवा, त्यावर अभ्यास करून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

श्री अंबाबाईच्या मूर्तीची मोठी झीज झाली आहे. त्यामुळे भारतीय पुरातत्व खात्याच्या रसायन शाखेच्या वतीने २०१५ साली अंबाबाई मूर्तीचे केमिकल कॉन्झर्व्हेशन करण्यात आले आहे. त्यानंतर वेळोवेळी मूर्तीच्या स्थितीची पाहणी केली जाते. गेल्या वर्षभरात मूर्तीची पाहणी झालेली नसल्याने सोमवारी सकाळी साडेआठ वाजता विभागाचे उपाधीक्षक श्रीकांत मिश्रा, सुधीर वाघ, राज्य पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वहाने, उपाधीक्षक उत्तम कांबळे मंदिरात दाखल झाले. त्यांनी अंबाबाईच्या मूर्तीची तसेच महाकाली व महासरस्वतीच्या मूर्तींची पाहणी केली. अंबाबाईची मूर्ती सुस्थितीत आहे. एक दोन ठिकाणी कोटिंग निघाले आहे. ते पुन्हा करता येईल. मात्र, महाकाली व महासरस्वती या दोन्ही देवतांच्या मूर्तीची मोठी झीज झाली असून त्यांच्यावरही कॉन्झर्व्हेशन प्रक्रिया करण्याची सूचना त्यांनी केली.

मंदिरात मोठ्या प्रमाणात काजळीचा थर चढला असून ठिकठिकाणी दगड निखळले आहेत, वायरिंग, तारा दुरुस्त्या करणे गरजेचे असल्याचे विलास वहाने यांनी सांगितले. या दुरुस्तींसाठीचे नियोजन करून प्रस्ताव पाठवा त्यासाठीचे अंदाजपत्रक तयार करून काजळीचा थर काढून देऊ, असे मिश्रा यांनी देवस्थान समितीला सांगितले. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्य शिवाजी जाधव, सचिव विजय पोवार, हेरिटेज समितीच्या अध्यक्षा अमरजा निंबाळकर, उमाकांत राणिंगा, प्रसन्न मालेकर, गणेश नेर्लेकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

----

कोबा काढणे जोखमीचे

मंदिराच्या छतावर धोकादायक कोबा असून तो काढणे गरजेचे असल्याचे मत स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये मांडण्यात आले आहे. याची पाहणी सोमवारी अधिकाऱ्यांनी केली. यावेळी त्यांनी हे काम अधिक जोखमीचे आणि तितकेच अवघड आहे. आपल्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल आम्हाला पाठवा आम्ही त्यावर अभ्यास करून कोबा काढणे गरजेचे आहे का, काढल्यास काय होईल, न काढल्यास काय होईल, या सगळ्या शक्यतांचा अभ्यास करून त्यावर निर्णय घेऊ, असे सांगितले.

---

कुंड खोदताना काळजी घ्या

यावेळी त्यांनी खुदाई सुरू असलेल्या मणकर्णिका कुंडाची पाहणी केली. सध्या कुंडामध्ये टाकण्यात आलेला भरावच काढण्याचे काम सुरू आहे. कुंडाचे दोन भिंती आणि ढाचा आता दिसला आहे; पण दोन भिंती आणि अंतर्गत रचना याची पुनर्बांधणी करावी लागणार आहे. भोवतीने उतार, पायऱ्या झाल्यानंतर मध्यभागी कुंड आहे. या कुंडाच्या खुदाईचे काम सुुरू होईल त्यावेळी अधिक काळजी घ्या, अशा सूचना वहाने यांनी कॉन्ट्रॅक्टरवर हेरिटेज समितीला दिल्या.

---

फोटो नं १८०१२०२१-कोल-अंबाबाई मंदिर ०१,०२

ओळ : भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी कोल्हापुरातील श्री अंबाबाईची मूर्ती व मंदिराच्या शिखरावरील धोकादायक कोबा पाहणी केली.

--

Web Title: Idol of Ambabai in good condition - Inspection of idols and temple premises by Archaeological Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.