श्री क्षेत्र नृसिंहवाडी परिसरात कृष्णावेणी मातेच्या मूर्तीची परंपरेनुसार विधिवत प्रतिष्ठापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 08:31 PM2021-02-19T20:31:50+5:302021-02-19T20:33:37+5:30
Religious Places dattamandir Narsobawadi Kolhapur- श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिर परिसरात आज श्री कृष्णावेणी मातेच्या उत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला सकाळी अकरा वाजता कृष्णावेणी मातेच्या मूर्तीची परंपरेनुसार विधिवत प्रतिष्ठापना करणेत आली.
नृसिंहवाडी/कोल्हापूर : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिर परिसरात आज श्री कृष्णावेणी मातेच्या उत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला सकाळी अकरा वाजता कृष्णावेणी मातेच्या मूर्तीची परंपरेनुसार विधिवत प्रतिष्ठापना करणेत आली.
आज पासून दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवाची तयारी गेले महिनाभर चालू असून येथील दत्त मंदिराच्या उत्तरबाजूस या उत्सवासाठी मंडप व शामियाना उभारणेत आला आहे. आज पहाटे पाच वाजता मानकरी जनार्दन, सचिन, संदीप कागलकर आणि परिवार या मानकरींच्या घरातून श्री कृष्णावेणीची सालंकृत मूर्ती वाद्य, गजरासह मिरवणुकीने उत्सव मंडपात आणणेत आली.
घोडे, भालदार, चोपदार, दिवटी, छत्र चामर आणि वाद्यवृंदतसेच दुतर्फा ब्रम्हवृंद, घोडा आदी मिरवणूकीत सामील झालेने मिरवणुकीची शोभा वाढली होती. नृसिंहवाडी सह कुरुंदवाड, शिरोळ, इचलकरंजी, सांगली आदी भागातून आलेल्या महिलांनी मिरवणुकीवेळी कृष्णावेणी मातेस पंचारतीने ओवाळले व आशीर्वाद घेतले.
सकाळी अकरा वाजता कृष्णावेणी मातेची वेदशास्त्र संपन्न विश्वेश्वर उपाध्ये व अवधूतशास्त्री बोरगावकर यांच्या पौरोहित्याखाली गुरुप्रसाद विनायक बडड पुजारी यांनी विधिवत प्रतिष्ठापना केली. व जगतकल्याणासाठी मातेची प्रार्थना करणेत आली. पूजे नंतर ऋकसंहिता, ब्राम्हण, अरण्यक, श्री गुरुचरित्र, कृष्णामहात्म्य, श्रीमद् भागवत, श्री सुक्त, रुद्र एकादशिनी, सप्तशती आदी पारायणास आरंभ झाला.
दुपारी नैवेद्य आरती झालेनंतर तीन वाजता एकविरा भजनी मंडळ यांचे कृष्णा लहरी पठण, चार वाजता वेद शास्त्र संपन्न हरी नारायण चोपदार यांचे पुराण सायंकाळी पाच वाजता कु वैष्णवी जोशी रत्नागिरीयांचे भक्तीसंगीत व रात्रो दहा वाजता ह.भ.प. विवेक गोखले रा.नृसिंहवाडी यांचे कीर्तन असे कार्यक्रम संपन्न झाले.
संस्कार भारतीच्या रांगोळ्यांनी रस्ते फुलले
संस्कार भारती नृसिंहवाडी यांनी पूर्ण मिरवणूक मार्गावर घातलेल्या आकर्षक रांगोळी व नयनरम्य गालीच्यामुळे मिरवणूक मार्गावरील रस्ते विलोभनीय दिसत होते.