मूर्तिदानाने दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप

By admin | Published: September 18, 2015 11:57 PM2015-09-18T23:57:50+5:302015-09-19T00:03:55+5:30

पर्यावरणपूरक गणेशोत्सव : आवाहनाला प्रतिसाद देत शहरात सुमारे ६४० गणेशमूर्ती दान

The idol sends a half-day to Bappa | मूर्तिदानाने दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप

मूर्तिदानाने दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप

Next

कोल्हापूर : ‘गणपती बाप्पा मोरया...’चा गजर आणि चिरमुऱ्यांची उधळण करीत दीड दिवसाचा पाहुणा म्हणून आलेल्या गणपती बाप्पाला भाविकांनी शुक्रवारी जड अंत:करणाने निरोप दिला. दुष्काळाचे गांभीर्य आणि गेल्या काही वर्षांपासून सातत्याने केल्या जात असलेल्या प्रबोधनाला प्रतिसाद देत भाविकांनी मूर्तिदानाला प्राधान्य देत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला. पंचगंगा घाट, रंकाळा, कोटीतीर्थ, राजाराम बंधारा अशा विविध जलाशयांच्या ठिकाणी मिळून ६४० गणेशमूर्ती दान झाल्या.
काही कुटुंबांमध्ये विशेषत: ब्राह्मण कुटुंबांत दीड दिवसांतच गणेशमूर्ती विसर्जित केली जाते. गुरुवारीच घरी आलेल्या गणपतीला अवघ्या दीड दिवसांत या कुटुंबांनी निरोप दिला. पंचगंगा घाट येथे पंचगंगा घाट संवर्धन समितीतर्फे कृत्रिम विसर्जन कुंडाची सोय करण्यात आली होती. येथे मूर्तीचे विसर्जन करून भाविक ती दान करत होते. या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबद्दल भाविकांना अभिनंदनाचे प्रमाणपत्र दिले जात होते. अवनि संस्थेच्यावतीने निर्माल्य व मूर्तींचे संकलन केले.
रंकाळा परिसरात सर्वाधिक गणेशमूर्ती दान करण्यात आल्या. यासह कोटीतीर्थ, राजाराम बंधारा, राजाराम तलाव या सर्व ठिकाणी महापालिकेच्यावतीने मूर्तिदान स्वीकारले जात होते. घरगुती गणपतींशिवाय बालमंडळे, अपार्टमेंटमधील गणपती, असे मिळून दिवसभरात ६४० हून अधिक गणेशमूर्तींचे दान करण्यात आले.


सुज्ञ, सुजाण कोल्हापूरकर...
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनासाठी पंचगंगा घाट संवर्धन समितीतर्फे आवाहन करण्यात येत होते. त्याला प्रतिसाद देत पंचगंगा घाटावर ४० मूर्तींचे विसर्जन झाले. पर्यावरणपूरक विसर्जन केल्याबद्दल संबंधितांचा समितीने ‘सुज्ञ सुजाण कोल्हापूरकर’ असे प्रमाणपत्र देऊन गौरव केला. समितीचे अध्यक्ष महेंद्र कामत, उपाध्यक्ष विजय ससे, सचिव जयश्री तोडकर, खजानिस प्रमोद पुंगावकर, चंद्रकांत परुळेकर, कौशल शिर्के, कुणाल पाटील, जिल्हा हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर हे पर्यावरणपूरक विसर्जनासाठी आवाहन करीत होते.


दुसऱ्या दिवशीही गणेश आगमनाच्या मिरवणुका
कोल्हापूर : गणेशचतुर्थीच्या दुसऱ्या दिवशीही काही मंडळांच्या गणेश आगमनाच्या मिरवणुका सुरूच होत्या. पारंपरिक ढोल-ताशांसह डीजेच्या छोट्या पण दणदणीत आवाजाच्या सिस्टीमही या मिरवणुकीत मोठ्या मंडळांनी आणल्या होत्या.
गेले काही महिने शाहूपुरी कुंभार गल्ली, बापट कॅम्प, कुंभारगल्ली (गंगावेश), आदी ठिकाणी तरुण मंडळांच्या गणेशमूर्ती दुसऱ्या दिवशीही तयार करण्याचे काम सुरू आहे. मंडळांच्या गणेशमूर्ती जसजशा तयार होतील, तशी मंडळे या मूर्ती मिरवणुकांनी आपल्या मंडपांकडे नेत आहेत. काही मंडळांना गणेशमूर्ती नेण्यासाठी गुरुवारी वाहने उपलब्ध झाली नाहीत, तर काही मंडळांना डॉल्बी सिस्टीम आणि ढोल-ताशे पथकांचे दर परवडत नसल्याने या मंडळांनी दुसऱ्या दिवशी दर कमी येत असल्याने दुसऱ्या दिवशीच गणपती नेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अनेक मंडळांनी गणेशमूर्ती शुक्रवारी सायंकाळी नेल्या. शुक्रवारी शिवाजी चौकाचा ‘महागणपती’ खुला करण्यात आला. या ठिकाणी गणेशाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी झाली होती.

Web Title: The idol sends a half-day to Bappa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.