अजित पवार कार्यक्षम, तर मग निर्णय का होत नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:23 AM2021-05-15T04:23:00+5:302021-05-15T04:23:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : अजित पवार हे कार्यक्षम, झटपट निर्णय घेतात. मग ...
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : अजित पवार हे कार्यक्षम, झटपट निर्णय घेतात. मग मराठा समाजाच्या इतर मागासांच्या सवलती अजूनही का जाहीर होत नाहीत, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानतानाच पाटील यांनी पवारांना चिमटा काढला आहे. केंद्र सरकारने दाखल केलेल्या याचिकेमुळे या प्रकरणामध्ये समाजाला थोडा दिलासा मिळाला आहे. आता राज्य सरकारनेही तातडीने अशीच याचिका दाखल करावी.
पाटील म्हणाले, कोणत्याही परिस्थितीमध्ये नवीन मागास आयोग आणि नवीन सर्वेक्षण करून मराठा मागास असल्याचे पुन्हा सिद्ध करणे याला पर्याय नाही; परंतु अजूनही राज्य सरकार याबाबत अन्वयार्थच लावत बसले आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी ज्या बारकाईने ‘जे इतर मागासांना ते मराठा समाजाला’ या तत्त्वानुसार सवलती जाहीर केल्या होत्या. त्या तरी का जाहीर होत नाहीत. आम्ही दरवेळी कॅबिनेट झाली की आशेने पाहतो.
अजित पवार हे कार्यक्षम, डायनॅमिक मंत्री आहेत. आमदारांचा एक कोटीचा निधी कोरोनासाठी देण्याचा निर्णय त्यांनी बैठकीतच घेतला आणि रात्रीच शासन आदेश निघाला. मग वडेट्टीवार यांच्याकडून ‘सारथी’ काढून घेऊन पवार यांनी त्यामध्ये नवीन काय केले. त्याही पुढे जावून आण्णासाहेब पाटील महामंडळ ‘नियोजन’कडे घेतलं. त्याबाबतीत तरी त्यांनी कुठला निर्णय घेतला. उलट हे महामंडळ स्वायत्त होते. १४ हजार तरुणांना कर्जे दिली गेली. आता ते ‘नियोजन’च्या ताब्यात जावून त्यांचे सरकारीकरण झाले आहे, असे पाटील म्हणाले.
चौकट
लस नाही पुरविली तर मग अव्वल कसे
एकीकडे केंद्र सरकारने लस पुरविली नाही म्हणायचे आणि दुसरीकडे लसीकरणामध्ये महाराष्ट्र देशात अव्वल, म्हणायचे हा दुटप्पीपणा आहे. काही झाले की मोदी यांच्या नावाने बोंब मारायची, ही राहुल गांधी यांनी शिकवण दिली आहे. त्याचे अनुकरण अशोक चव्हाण करत आहेत. एकदा बोंब मारली की पडला व्हेन्टिलेटर, दुसऱ्यांदा बोंब मारली की पडले रेमडेसिविर इंजेक्शन असे होत नाही. मोदी बोलत नाही. काम करतात. डिसेंबरअखेर संपूर्ण देशाचे लसीकरण झालेले असेल, असे पाटील यांनी सांगितले.