भूलतज्ज्ञ दिला नाही तर खुर्चीत बसू देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:17 AM2021-01-10T04:17:19+5:302021-01-10T04:17:19+5:30
कोल्हापूर : केवळ भूलतज्ज्ञ नाही म्हणून गेले काही महिने हृदय शस्त्रक्रिया थांबल्या ...
कोल्हापूर : केवळ भूलतज्ज्ञ नाही म्हणून गेले काही महिने हृदय शस्त्रक्रिया थांबल्या आहेत. जर रविवारपर्यंत भूलतज्ज्ञ उपलब्ध करून दिला नाही तर तुम्हांला खुर्चीत बसू देणार नाही, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार यांनी शनिवारी दिला. यावेळी शाब्दिक चकमक उडाली.
भूलतज्ज्ञ उपलब्ध करून दिला जात नसल्याने हृदय शस्त्रक्रिया बंद असल्याचे वृत्त शुक्रवारच्या ‘लोकमत’च्या अंकात प्रसिद्ध झाले होते. याची दखल घेत शिवसेनेने सीपीआर प्रशासनावर शनिवारी हल्लाबोल केला.
पवार म्हणाले, जर यातून एखाद्याचा मृत्यू झाला तर ‘सीपीआर’मधून मृतदेह हलवू दिला जाणार नाही. डॉ. आरती घोरपडे यांनी हृदय शस्त्रक्रियेसाठी भूल देण्याचे उच्च शिक्षण घेतले आहे. मात्र त्या स्वत: या विभागासाठी सेवा देत नाहीत आणि भूलतज्ज्ञही उपलब्ध करून देत नाहीत. याला डॉ. घाेरपडे यांनी यावेळी आक्षेप घेतला. त्या म्हणाल्या, माझ्याकडे अधिष्ठाता पदाचा कार्यभारही असतो. जादा भूलतज्ज्ञ नियुक्तीचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे प्रशासनाचे काम करीत मला ही सेवा देणे शक्य नाही.
यावर हृदय शस्त्रक्रिया विभागाचे डॉ. किशोर देवरे, डॉ. अक्षय बाफना यांनी मात्र तीव्र आक्षेप घेतला. बाफना म्हणाले, केवळ प्रशासकीय पद आहे म्हणून भूल देण्याला नकार देणे चुकीचे आहे. आतापर्यंत आम्हांला कोणीही भूलतज्ज्ञ दिला तरी आम्ही त्यांना प्रशिक्षण देऊन तीन हजार शस्त्रक्रिया केल्या आहेत. आताही कुणीही सहकारी आम्हांला द्या. आम्ही काम करतो. यावर डॉ. घोरपडे गुळमुळीत बोलू लागल्यानंतर सर्वांनीच अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांना धारेवर धरले. यावर सोमवार (दि. ११) नंतर भूलतज्ज्ञ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन डॉ. मोरे यांनी दिले. ही तयारी दर्शवल्यानंतर ‘याच्याआधी तुम्ही ही व्यवस्था का केली नाही?’ असा सवाल सुजित चव्हाण यांनी विचारला. यावेळी अवधूत साळाेखे, दत्ता टिपुगडे, शिवाजी जाधव, मंजित माने, सुनील पवार उपस्थित होते.
०९०१२०२१ कोल सीपीआर ०१
कोल्हापुरातील ‘सीपीआर’च्या हृदय शस्त्रक्रिया विभागाला भूलतज्ज्ञ उपलब्ध करून दिला जात नसल्याबद्दल शनिवारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांनी जाब विचारला. यावेळी त्यांनी अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांच्यासह जबाबदार डॉक्टरांना धारेवर धरले.
छाया : आदित्य वेल्हाळ