Lok Sabha Election 2019 बॉम्ब फोडला तर महाडिकांना प्रचार थांबवावा लागेल: पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:41 AM2019-04-19T00:41:23+5:302019-04-19T00:41:37+5:30
गारगोटी : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक व त्यांच्या बगलबच्च्यांकडून माझ्याबाबत अफवा पसरविल्या जात आहेत. महाडिकांनी व आमच्या पक्षात ...
गारगोटी : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक व त्यांच्या बगलबच्च्यांकडून माझ्याबाबत अफवा पसरविल्या जात आहेत. महाडिकांनी व आमच्या पक्षात आलेल्या त्यांच्या बगलबच्च्यांनी या चुकीच्या बातम्या पसरवायच्या बंद नाही केल्या तर असा बॉम्ब फोडेन की, महाडिकांना निवडणुकीपूर्वीच प्रचार बंद करावा लागेल, असा गर्भित इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी
दिला.
कडगाव (ता. भुदरगड) येथे शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये ते बोलत होते. मंत्री पाटील यांचे महाडिक यांच्याशी घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे पालकमंत्री आम्हालाच मदत करणार, अशी चर्चा महाडिकसमर्थक भाजपच्या वर्तुळातून पेरली जात आहे. त्याचा मंत्री पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला व गद्दारी आमच्या रक्तात नसल्याचा इशारा दिला.
मंत्री पाटील म्हणाले, खासदार महाडिक मीच कोल्हापुरात विमान आणले, शिवाजी पूल बांधला, रेल्वेचा विस्तार केला, कोट्यवधी रुपयांचे रस्ते केले; अशा वल्गना करीत आहेत. त्या कामांचे नारळही फोडत आहेत; परंतु त्यांना मला सांगावे वाटते की, युती शासनाने केलेल्या या सर्व कामांचे श्रेय घेण्याचा तुम्हाला अधिकार नसून, ज्या पक्षाचे देशात चार खासदार आहेत, अशा विरोधी पक्षाच्या खासदाराने ‘मी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला’, अशी टिमकी वाजवू नये. ही निवडणूक ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद अथवा विधानसभेची नाही आहे, तर देशाचे भवितव्य व देश सुरक्षित ठेवणारी आहे. त्यामुळे मतदारांनी साड्या, भांडी, जोडवी तसेच जेवणावळी यासारख्या आमिषांना न बळी पडता देशाचे हित लक्षात घेऊन मोदी यांच्या हाती देशाची एकहाती सत्ता देण्याकरिता प्रा. संजय मंडलिक यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या.
आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, प्रा. मंडलिक यांच्याविषयी मतदारसंघामध्ये लाट निर्माण झाली आहे. सर्वसामान्य जनतेने आपले मतदान कोणाला करावयाचे हे पक्के ठरवले असून, आता ग्रामीण भागातील जनता कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही. खासदारांनी ग्रामीण भागातील जनतेची फसवणूक केली. त्यामुळे त्यांच्याविषयी असणारी जनमाणसांची विश्वासार्हता कमी झाली आहे. त्यामुळे त्यांचा पराभव अटळ आहे.
माजी उपसभापती सत्यजित जाधव म्हणाले, आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून काम करीत असलो तरी जिल्ह्णाचे नेते सतेज पाटील यांच्या आदेशानुसार महायुतीचे उमेदवार प्रा. मंडलिक यांना विजयी करण्याकरिता जिवाचे रान करीत आहोत.
माजी सभापती बाबा नांद्रेकर म्हणाले, मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मंडलिक यांना जास्तीत जास्त मताधिक्य देऊन खासदार करणे गरजेचे आहे.
यावेळी ‘बिद्री’चे माजी उपाध्यक्ष विजयसिंह मोरे, माजी संचालक के. जी. नांदेकर, भाजपचे संघटनमंत्री बाबा देसाई, माजी संचालक दत्तात्रय उगले, युवा नेते संदीप वरंडेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, जिल्हा सरचिटणीस प्रवीण सावंत, भाजप तालुकाध्यक्ष नाथाजी पाटील, विश्वजित जाधव, तालुकाप्रमुख अविनाश शिंदे, शिवाजी ढेंगे, विलास बेलेकर, जयवंत चोरगे, माजी सभापती पांडुरंग पाटील,
अजित देसाई, सदाभाऊ देसाई, अरविंद देसाई, के. पी. जाधव,
बाबूल सर, शहाजी देसाई, रमेश देसाई, तमास पिंटो, शुभांत ताम्हणेकर, मानसिंग पाटील, विश्वनाथ जाधव, श्रावण भारमल यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित
होते.
आम्ही टाळ्या
पिटत होतो काय?
कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या सगळ्या विकासकामांचे श्रेय महाडिक घेत आहेत. त्याचे नारळ तुम्ही फोडत आहात. चॅनेल असल्यामुळे त्याच्या बातम्या तुम्ही दाखवत असला तरी सरकार
आमचे आहे. सगळं तुम्हीच केले असेल तर सरकार म्हणून आम्ही काय चार वर्षे नुसत्या टाळ्या पिटत
होतो काय? अशीही खोचक विचारणा मंत्री पाटील यांनी यावेळी केली.