वाहक भरले नाहीत, तर आमचे राजीनामे
By admin | Published: May 13, 2017 12:47 AM2017-05-13T00:47:24+5:302017-05-13T00:47:24+5:30
वाहक भरले नाहीत, तर आमचे राजीनामे
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : प्रशासनाचे दुर्लक्ष, के.एम.टी.कडील अधिकाऱ्यांचा निष्क्रियपणा, कर्मचाऱ्यांची मनमानी यामुळेच के.एम.टी. तोट्यात चालली असून, येत्या महिन्याभरात रोजंदारीवर ५० वाहकांची भरती केली नाही तर सभापती म्हणून मी, परिवहन समितीचे सदस्य राजीनामा देऊन आयुक्तांचा निषेध करतील, असा इशारा परिवहन सभापती नियाज खान यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला.
यापुढील काळात रोजंदारीवरील तसेच कायम वाहक, चालकांनी पूर्वपरवानगी न घेताच जर अचानक दांड्या मारल्या तर अशांची गय केली जाणार नाही. त्यांना सरळ कामावरून कमी करण्यात येईल, अथवा निलंबित करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
के.एम.टी.कडे बसेस चांगल्या आहेत. प्रवासीही मोठ्या संख्येने मिळत आहेत; परंतु वाहक, चालक यांचे अचानक दांड्या मारण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, त्यामुळे के.एम.टी. प्रशासनास काही मार्गांवरील गाड्या बंद ठेवाव्या लागत आहेत, त्याचा फटका मोठ्या प्रमाणात बसत आहे. प्रत्येक दिवशी ३० ते ३५ हजार रुपयांच्या उत्पन्न बुडत आहे. परिवहन समितीचे सदस्य उत्पन्नवाढीचे जातीने प्रयत्न करत असताना के.एम.टी. कर्मचारी, अधिकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. बसेस चालविणारेच बेजबाबदार व मनमानी वृत्तीने वागत असल्याने आमचे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत, असे खान यांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी ३० चालक भरले आहेत. आता ५० रोजंदारी वाहक भरा म्हणून आयुक्तांना विनंती केली आहे; परंतु आयुक्त त्यासंबंधीच्या प्रस्तावावर सहीच करायला तयार नाहीत. आयुक्तांसारखे अधिकारीच जर निर्णय घ्यायला वेळ लावणार असतील तर मग के.एम.टी.चा गाडा कसा चालणार, असा सवालही खान यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेस लाला भोसले, सचिन पाटील, विजयसिंह खाडे, चंद्रकांत सूर्यवंशी, उमा बनसोडे, शोभा कवाळे उपस्थित होते.
संजय भोसले बिनकामाचा माणूस
प्रभारी अतिरिक्त वाहतूक व्यवस्थापक संजय भोसले हे अत्यंत निष्क्रिय आणि बिनकामाचा माणूस आहे. त्यांचे के.एम.टी.कडे अजिबात लक्ष नाही. मागच्या महिन्यात सलग २३ दिवस ते के.एम.टी.च्या कार्यालयात फिरकले नव्हते. उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे परिवहन समितीच्या सभेलाही येत नाहीत.
यापुढे जर भोसले यांनी के.एम.टी.च्या कामात गांभीर्याने लक्ष घातले नाही तर त्यांच्या कार्यालयास कुलूप लावण्यात येईल, असा इशारा नियाज खान यांनी दिला. त्यांना जर के.एम.टी.चे कामकाज जमणार नसेल तर नोकरीचा राजीनामा देऊन घरला जावे. अन्य कोणाला तरी चांगले काम करण्याची संधी मिळेल, असे आवाहनही त्यांनी केले.
मनपामुळेच के.एम.टी. टिकलीय
महापालिका प्रशासनाने आर्थिक मदत केल्यामुळेच के.एम.टी. टिकली आहे. लाला भोसले सभापती असताना १० कोटींची मदत केली होती. आता मी सभापती असताना ८ कोटींची मदत करायचे ठरविले आहे. जर मनपा प्रशासनाने मदत केली नसती तर के.एम.टी. बंदच पडली असती, पण येथील प्रभारी व्यवस्थापकापासून ते वाहक, चालक, कार्यालयातील कर्मचारी यांची काम करण्याची मानसिकता नाही, असेही खान यांनी
सांगितले.