धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:24 AM2021-04-21T04:24:07+5:302021-04-21T04:24:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गेल्यावर्षी कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. मुंबई, पुण्यासह ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गेल्यावर्षी कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. मुंबई, पुण्यासह हजारोजण कोल्हापूर जिल्ह्यात येणार याची माहिती होती. सर्व रस्ते बंद करण्यात आले. येणाऱ्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. हातावर क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात आले. शहरातील महाविद्यालयांमध्ये आणि गावातील शाळांमध्ये आठवडाभर ठेवण्यात आले आणि मग घरी सोडण्यात आले. तरीही हजारो जणांना कोरोनाची लागण झाली. आता यातील काहीही सुरू नाही. सर्व काही बंद आहे. शासनाने नियम आणि अटी अशा केल्या आहेत की, त्यामुळे कोरोनाबाबत ‘धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय’ अशी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेची अवस्था झाली आहे.
जिल्ह्यात गेल्यावर्षी कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून टप्प्या-टप्प्याने सर्व शासकीय यंत्रणा सक्रिय करण्यात आल्या. निधीच्या मर्यादा असतानाही निर्णय वेळेत घेतले गेले. सुरुवातीला मूलभूत सुविधा उपलब्ध करताना वेळ गेला. परंतु नंतर मात्र एकदा यंत्रणा उभारल्यानंतर त्याचा उपयोग सुरू झाला. संकटाची तीव्रता ओळखून स्वयंसेवी संस्थांनी धाव घेतली. कोविड केअर सेंटर्स उभारली. ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आणि सप्टेंबरच्या अखेरीपासून कोरोनाचा कहर कमी होऊ लागला.
आता पुन्हा जानेवारीनंतर जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या टप्प्या-टप्प्याने वाढत आहे. १ एप्रिलपासून तर ती संख्या वेगाने वाढायला सुरुवात झाली. ३४ ही उच्चांकी मृत्युसंख्या सोमवारी नोंदविण्यात आली. रोज ५०० च्या घरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण येत आहेत. एप्रिलअखेरपर्यंत ही संख्या वाढतच जाणार आहे. परंतु गेल्यावर्षी बाहेरून येणाऱ्यांवर जिल्ह्यात जी बंधने घातली आहेत, ती गळून पडल्याने धोका आणखी वाढला आहे.
चौकट
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंशत: अंमलबजावणी आवश्यक
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या आणि जिल्ह्यातील अंतर्गत प्रवासासाठी निगेटिव्ह अहवाल सक्तीचा केला होता. यावरून तक्रारी झाल्या आणि २४ तासात त्यांना तो आदेश मागे घ्यावा लागला. जिल्ह्यातच प्रवास करतानाची अट मागे घेतली असती, तर बाहेरून येणाऱ्या प्रवाशांसाठी काही तरी बंधन आवश्यक होते. परंतु हा आदेशच मागे घ्यायला लावण्यात आल्याने आता सरसकट मुंबई, पुण्याहून आलेली मंडळी थेट घरातच वास्तव्यास जात आहेत. अजूनही या निर्णयाची अंशत अंमलबजावणी आवश्यक आहे.
चौकट
कितीजण जिल्ह्यात आले याचा पत्ताच नाही
जिल्ह्यात येणाऱ्या सर्व रस्त्यांवर गेल्यावर्षी बंदोबस्त लावून त्या ठिकाणी येणाऱ्यांची तपासणी आणि नोंदणी होत होती. परंतु या वेळेला शहरांवरील भार कमी करण्यासाठी या सगळ्याला फाटा देण्यात आल्याने, आता बाहेरून किती मंडळी आली आणि ती कुठे गेली याची कोणतीही नोंद अजून तरी केली जात नाही.
चौकट
१९ दिवसात १४५ मृत्यू
गेल्या १९ दिवसात कोल्हापूर जिल्ह्यात १४५ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. यातील २५ हून अधिक रुग्ण हे अन्य जिल्ह्यातील असले तरी, उर्वरित कोल्हापूर जिल्ह्यातीलच आहेत. १ एप्रिलपासून १९ तारखेपर्यंत ५६९१ नवे रुग्ण बाधित झाले आहेत. त्यामुळे यापुढच्या काळात परिस्थिती आणखी गंभीर होत असताना, ग्रामसमित्या आणि शहरांमधील प्रभाग समित्या अजूनही ताकदीने सक्रिय नसल्याचे जाणवते. तुलनेत कोल्हापूर शहरात प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. परंतु रोजीरोटी थांबता कामा नये, या एकाच निकषामुुळे प्रशासनाच्या कडकपणालाही मर्यादा आल्या आहेत.