..तर छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा - राधाकृष्ण विखे पाटील 

By इंदुमती सूर्यवंशी | Published: November 28, 2023 06:31 PM2023-11-28T18:31:36+5:302023-11-28T18:32:22+5:30

ओबीसी मुद्द्यावरून वाद निरर्थक

If Chhagan Bhujabal wants to speak on the OBC issue, he should resign from the ministerial post says Radhakrishna Vikhe Patil | ..तर छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा - राधाकृष्ण विखे पाटील 

..तर छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा - राधाकृष्ण विखे पाटील 

कोल्हापूर : मराठा आरक्षणावरून दोन समाजात निरर्थक वाद निर्माण केला जात आहे. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भूजबळ यांना ओबीसी मुद्द्यावरून बोलायचे असे तर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, मंत्रीमंडळातून बाहेर पडून त्यांनी यावर बोलावे, अशा शब्दात महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी छगन भूजबळ यांना मंगळवारी घरचा आहेर दिला.

मंत्री विखे पाटील हे मंगळवारी अल्पकाळासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. अंबाबाईच्या दर्शनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ओबीसीचा मुद्दा पुढे करून सुरु असलेल्या आंदोलनाची गरजच नव्हती. मराठा आरक्षणावरून ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद निरर्थक आहे. छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी संयम बाळगण्याची गरज आहे. आज त्यांच्याबद्दल लोकं आदराने बोलतात पण पुढे त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करावी लागेल. एवढेच असेल तर त्यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर येऊन बोलले पाहिजे. 

मंत्रिमंडळातीलच नेते असे वक्तव्य करत असतील तर सरकारमध्ये एक वाच्यता नाही असा संदेश नागरिकांमध्ये जातो. सरकारबाबतची विश्वासार्हता कमी होते. त्यामुळे एक तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे नाहीतर त्यांच्या बाबत वेगळी भूमिका घेण्याबाबत सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी विचार केला पाहिजे. मराठा आरक्षणासंदर्भात जे आंदोलन सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर शासनाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी न करता आपण मराठा समाजासाठी आरक्षण द्यायला हवे त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

शेतकऱ्यांना लवकरच मदत

मंत्री विखे पाटील म्हणाले, अवकाळीने शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश मुख्यमंत्रयांनी दिले आहेत. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली जाईल. याशिवाय आणखी काही मदत करता येईल का दृष्टीने विचार सुरू आहे.

Web Title: If Chhagan Bhujabal wants to speak on the OBC issue, he should resign from the ministerial post says Radhakrishna Vikhe Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.