‘कोरोना’ वादळ शांत झाले तर शक्य ...महापालिका निवडणूक ठरल्यावेळीच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 11:07 AM2020-04-14T11:07:18+5:302020-04-14T11:09:51+5:30

एप्रिल व मे महिन्यात तीन महानगरपालिका, नऊ नगरपरिषदा, १० पोटनिवडणुका, १५७० ग्रामपंचायतींची निवडणूक होणार होती, त्यांची पक्रियासुद्धा सुरू झाली होती. तसेच १२ हजार ०१५ ग्रामपंचायतींत प्रभाग रचना, मतदार यादी, प्रत्यक्ष निवडणुकीची तयारी अशी कामे सुरू होती.

If the 'Corona' storm calms down, is it possible ... just when the municipal elections are scheduled? | ‘कोरोना’ वादळ शांत झाले तर शक्य ...महापालिका निवडणूक ठरल्यावेळीच?

‘कोरोना’ वादळ शांत झाले तर शक्य ...महापालिका निवडणूक ठरल्यावेळीच?

Next
ठळक मुद्देकोल्हापूर महापालिका निवडणूक शाखेशी याबाबत संपर्क साधला असता, निवडणुकीसंदर्भात कोणतीही माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून आलेली नाही. आयोगाच्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही केली जाईल

कोल्हापूर : एप्रिल-मे महिन्यात होऊ घातलेल्या राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या असल्या तरी कोल्हापूर महानगरपालिकेची आक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारी सार्वत्रिक निवडणूक ठरल्यावेळीच होण्याची शक्यता आहे. कोरोनाचे वादळ जूनपर्यंत शांत झाले तरच हे शक्य आहे. कोरोनाची साथ सुरूच राहिली तर मात्र तीन महिने ही निवडणूक पुढे ढकलली जाऊ शकते.

एप्रिल व मे महिन्यात तीन महानगरपालिका, नऊ नगरपरिषदा, १० पोटनिवडणुका, १५७० ग्रामपंचायतींची निवडणूक होणार होती, त्यांची पक्रियासुद्धा सुरू झाली होती. तसेच १२ हजार ०१५ ग्रामपंचायतींत प्रभाग रचना, मतदार यादी, प्रत्यक्ष निवडणुकीची तयारी अशी कामे सुरू होती. परंतु राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढायला लागला आणि त्यामुळे राज्य तसेच केंद्र सरकारने राज्यात २५ मार्च रोजी लॉकडाऊन जाहीर केला. लॉकडाऊनची मुदत ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यु. पी. एस. मदान यांनी १७ मार्च रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर असतील त्याच टप्प्यावर पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात येत असल्याचा अध्यादेश लागू केला. त्याच दिवशी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनीदेखील तत्काळ अध्यादेश लागू करून निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले.

कोल्हापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणुक आॅक्टोबरच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. त्याची पूर्वतयारी जून महिन्यापासून होणार आहे. कोल्हापूर महानगरपालिकेचे प्रभाग गत निवडणुकीत निश्चित केले आहेत. आता फक्त आरक्षण टाकणे आणि प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचे काम बाकी आहे. त्यामुळे जून महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोनाचे संकट पूर्णपणे टळले आहे याची खात्री झाली तर कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक आॅक्टोबर अखेरीस होऊ शकते. मात्र, कोरोनाचा संसर्ग सुरूच राहिला तर मात्र निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणे आणि मुदतीत निवडणूक होणे अशक्य आहे.

कोल्हापूर महापालिका निवडणूक शाखेशी याबाबत संपर्क साधला असता, निवडणुकीसंदर्भात कोणतीही माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून आलेली नाही. आयोगाच्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही केली जाईल, असे शाखेचे अधीक्षक विजय वणकुद्रे यांनी सांगितले.
 

Web Title: If the 'Corona' storm calms down, is it possible ... just when the municipal elections are scheduled?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.