लढा पुस्तकात न उतरल्यास गुन्हा : राजन गवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:27 AM2018-09-19T00:27:24+5:302018-09-19T00:27:29+5:30
आजरा : सामान्य माणसाचं जगणं सुसह्य व्हावे म्हणून चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांनी लढे उभा केले, अशा कार्यकर्त्यांचे लढे पुस्तकात लिहिले नसल्याची खंत व्यक्त करून यापुढेही न लिहिल्यास आमच्या हातून गुन्हा ठरेल, अशा शब्दांत डॉ. राजन गवसे यांनी खंत व्यक्त केली. आजरा येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरात कॉ. संपत देसाईलिखित ‘एका लढ्याची यशोगाथा’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नागपूरचे आयुक्त आप्पासाहेब धुळाज होते.
यावेळी डॉ. गवस म्हणाले, शंकर धोंडी पाटील, काका देसाई, अॅड. श्रीपतराव शिंदे, आदींनी आपले आयुष्य खर्च केले. यांच्या लढ्याची कुठेही नोंद नाही. त्यामुळे आम्ही गुन्हेगार आहोत. मात्र, ‘एका लोकलढ्याची यशोगाथा’ हे पुस्तक इतिहासात नोंद होईल. मध्यवर्गाची घरापासून नाळ तुटली, तशी सामान्य माणसापासूनही तुटली. गांधीशिवाय पर्याय नसून गांधी, आंबेडकर, मार्क्सवाद यांच्या चांगल्या तत्त्वांची बांधणी झाली तरच यापुढे चळवळी टिकणार आहेत.
कॉ. संपत देसाई म्हणाले, चित्रीचा लढा डॉ. भारत पाटणकर, कॉ. धनाजी गुरव, कॉ. अशोक जाधव, कॉ. संजय तर्डेकर, आदी कार्यकर्त्यांमुळे यशस्वी झाला. यावेळी कवी व अजय कारंड, सामाजिक कार्यकर्ते महेश पेडणेकर, प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांनी पुस्तकाबाबत मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते श्रीपतराव शिंदे, प्रा. राजभाऊ शिरगुप्पे, प्रा. सुनील शिंत्रे, सुधीर देसाई, ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे, एम. एल. चौगुले, अंकुश कदम, मायकेल फर्नांडिस, रावसाहेब देसाई, प्रकाश मोरस्कर, नितीन पाटील, आदी उपस्थित होते.
प्रा. डॉ. नवनाथ शिंदे यांनी स्वागत केले. रवी शेंडे यांनी प्रास्ताविक केले.