‘देवदासीं’चा मागण्या मान्य न झाल्यास २२ फेब्रुवारीला पुन्हा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 06:05 PM2019-01-25T18:05:13+5:302019-01-25T18:07:53+5:30
देवदासींनी सादर केलेल्या संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतनाचा लाभ मिळणेबाबतच्या प्रस्तावाला त्वरित मंजुरी द्यावी, आदी मागण्यांसाठी नेहरू युवा देवदासी विकास मंडळाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातील ताराराणी चौकातील कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली.यामध्ये जिल्ह्यातील देवदासी महिलांचा सहभाग होता.
कोल्हापूर : देवदासींनी सादर केलेल्या संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतनाचा लाभ मिळणेबाबतच्या प्रस्तावाला त्वरित मंजुरी द्यावी, आदी मागण्यांसाठी नेहरू युवा देवदासी विकास मंडळाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातील ताराराणी चौकातील कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली.यामध्ये जिल्ह्यातील देवदासी महिलांचा सहभाग होता.
यावेळी पाटील यांचे स्वीय्य सहायक बी. बी. यादव यांना ताराराणी चौकातील पाटील यांच्या कार्यालयात निवेदन दिले. या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास पुन्हा २२ फेब्रुवारीला मोर्चा काढू, असा इशारा माजी नगरसेवक अशोक भंडारे यांनी दिला.
गेली २५ वर्षे देवदासी मागण्यांसाठी सातत्याने झटत आहेत. तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने फसवणूक केली. त्यानंतर सत्तेवर आलेले भाजप-शिवसेना सरकारही त्यांची फसवणूक करीत आहे. वयोवृद्ध, निराधार, विधवा, देवदासी महिलांच्या पेन्शनमध्ये गेली १0 वर्षे कोणतीही वाढ केलेली नाही. त्यामध्ये वाढ करून ती तीन हजार रुपये करावी.
यावेळी अशोक भंडारे म्हणाले, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हा लढा सुरू ठेवायचा आहे. आपल्या मागण्यांचे निवेदन शासनाकडे पाठविण्यात आले आहे. त्यावर सकारात्मक निर्णय न झाल्यास पुन्हा २२ फेब्रुवारीला मोर्चा काढू. या मोर्चात माजी नगरसेविका मायादेवी भंडारे, देवाताई साळोखे, रेखा वडर, छाया चित्रुक, शारदा पाटोळे, दिलीप चित्रुक, रमेश साठे, नसीम देवरी, पंकज भंडारे, आदींचा सहभाग होता.
सरकारविरोधात घोषणाबाजी...
‘पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देवदासींना न्याय द्यावा’,‘गोरगरिब देवदासींना खोटे, लबाड आश्वासन देऊ नका’, अशा आशयाचे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. तसेच सरकारविरोधात घोषणाबाजी केली.