...तर आघाडीत थंड

By admin | Published: September 16, 2014 12:06 AM2014-09-16T00:06:13+5:302014-09-16T00:08:49+5:30

महायुतीच्या कार्यालयात लगबग : राजकीय पक्ष कार्यालयातील चित्र

... if the front is cold | ...तर आघाडीत थंड

...तर आघाडीत थंड

Next

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज, सोमवारी भाजप-शिवसेनेसह भाकपच्या कार्यालयात लगबग, तर कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यालयात सामसूम असे चित्र पाहायला मिळाले.
शिवसेनेच्या शनिवार पेठ येथील शहर कार्यालयात शिवसैनिकांची धावपळ सुरू होती. निवडणूक साहित्यांची जमवाजमव व वितरण याबाबतचे नियोजन सुरू होते. आमदार राजेश क्षीरसागर बैठकीसाठी मुंबईला गेले होते. त्यांच्या गैरहजेरीत त्यांचे कार्यकर्ते या नियोजनात मग्न होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा गुरुवारी (दि. १८) दौऱ्यावर येणार असल्याने भाजपच्या बिंदू चौक येथील कार्यालयात आज त्यांच्या नियोजनाबाबतची बैठक सुरू होती. आमदार चंद्रकांतदादा पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती.
शिवाजी रोडवरील भाकपच्या कार्यालयात कोल्हापूर उत्तरचे उमेदवार रघुनाथ कांबळे यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांची बैठक सुरू होती. यावेळी ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. स्टेशन रोडवरील कॉँग्रेस कार्यालयात सामसूम होती. कार्यालय प्रमुख वगळता अन्य कोणीही नेते व पदाधिकारी इकडे दिवसभर फिरकले नव्हते. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात तर आज कुलूपच होते. सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हॉटेल पंचशील येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या स्वागतासाठी तिकडे गेल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: ... if the front is cold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.