गांधीनगर नळपाणीपुरवठा तोडल्यास जीवन प्राधिकरणचे कार्यालय बंद करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:23 AM2021-03-10T04:23:56+5:302021-03-10T04:23:56+5:30
उचगाव : गांधीनगर प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेत शहरालगतची १३ गावे मोठी आहेत. या गावांना पाण्यासाठी कोणतीही दुसरी पर्यायी ...
उचगाव : गांधीनगर प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेत शहरालगतची १३ गावे मोठी आहेत. या गावांना पाण्यासाठी कोणतीही दुसरी पर्यायी व्यवस्था नाही; त्यामुळे थकीत बिलावरून या १३ गावांचा पाणीपुरवठा बंद केल्यास जीवन प्राधिकरणाचे कार्यालय बंद करू, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी मंगळवारी दिला. या संदर्भातील निवेदन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता जे. डी. काटकर व शाखा अभियंता लोकरे यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, गांधीनगर प्रादेशिक नळपाणी योजनाअंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या थकबाकीचे कारण पुढे करून या गावांचा पाणीपुरवठा तोडू नये. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर हा प्रश्न मांडून यावर तोडगा काढणे गरजेचे आहे. यावेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, हर्षल सुर्वे, विनोद खोत, पोपट दांगट उपस्थित होते.
चौकट :
थकबाकीसाठी पाणीपुरवठा खंडित करण्याची नोटीस काढण्यापूर्वी संबंधित ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करणे क्रमप्राप्त होते; पण जीवन प्राधिकरणाकडून तसे झालेले नाही. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या थकबाकीसाठी गांधीनगर, उचगाव, गडमुडशिंगी, उजळाईवाडी, सरनोबतवाडी, गोकुळ शिरगाव, कणेरी, कणेरीवाडी, नेर्ली, तामगाव, मोरेवाडी, आर. के.नगर, पाचगाव, या गावांचा पाणीपुरवठा तोडल्यास शिवसेना जीवन प्राधिकरण योजनेच्या विरोधात आंदोलन करील असा इशारा पवार यांनी दिला.
फोटो : ०९ गांधीनगर पाणीपुरवठा
ओळ : गांधीनगर नळपाणी योजनेचे पाणी बंद करू नये, या मागणीचे निवेदन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार व करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता जे. डी. काटकर व शाखा अभियंता लोकरे यांना देण्यात आले.