दखल न घेतल्यास सरकार कोसळेल
By admin | Published: September 25, 2016 01:28 AM2016-09-25T01:28:35+5:302016-09-25T01:28:35+5:30
मराठा मोर्चांबाबत राणेंचा इशारा : ‘हर हर महादेव‘ म्हणून चाल करण्याची मराठ्यांवर वेळ
कोल्हापूर : राज्यात दहा-पंधरा लाखांचे मराठ्यांचे मोर्चे निघत असतानाही जर दखल घेतली नाही, तर राज्य सरकार कोसळेल, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिला. सरकार बदलण्याची ताकद या मोर्चांमध्ये आहे असे सांगून, आता ‘हर हर महादेव’ म्हणून चाल करण्याची वेळ मराठ्यांवर आली आहे, असेही ते म्हणाले.
येथील राजाराम कॉलेजचे प्राचार्य कै. डॉ. बाळकृष्ण यांच्या ‘शिवाजी द ग्रेट’ या इंद्रजित सावंत यांनी संपादित केलेल्या ग्रंथाचे प्रकाशन शनिवारी राणे यांच्या हस्ते येथील केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये झाले. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आरक्षणाबाबत सरकारनेच आता ठोस भूमिका घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
राणे म्हणाले, घटनेच्या १५/४ आणि १६/४ या कलमांनुसार सामाजिक आणि आर्थिक मागास समाजाला आरक्षण देता येते. याचा आधार घेऊन आमच्या सरकारने अन्य कोणाचेही आरक्षण काढून न घेता तमिळनाडूच्या धर्तीवर ५२ टक्क्यांवर आरक्षण मागितले होते. मात्र, न्यायालयात यामध्ये त्रुटी निघाल्या. आम्ही १८ लाख जणांचे सर्वेक्षण करून जो अहवाल मांडला, त्यातील ठळक मुद्दे मांडून हे आरक्षण न्यायालयात टिकविता (पान १ वरून) येईल. ते या सरकारने करण्याची गरज आहे. आतापर्यंत मनोहर जोशी आणि सध्याचे सोडले तर जे मुख्यमंत्री झाले त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका घेतली. मी मराठा जातीत जन्माला आलो, त्यामुळेच आताचे हे मोर्चे पाहून मला समाधान वाटते, आनंद वाटतो. (प्रतिनिधी)