एक जीव वाचला तर ते माझ्या कामाचे यश
By admin | Published: May 6, 2017 12:36 AM2017-05-06T00:36:01+5:302017-05-06T00:36:29+5:30
संजय मोहिते : वाहतुकीला शिस्त लावण्यास प्राधान्य; ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्यात सर्वत्र वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे. वाहन अपघातांमध्ये मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यास प्राध्यान्य राहील. वाढत्या अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी करून एक जीव वाचला तर ते माझ्या कामाचे यश असेल, असे मत नूतन पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
मोहिते यांनी नुकतीच पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर ‘लोकमत’च्या शहर कार्यालयास शुक्रवारी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचा वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मोहिते यांनी ‘लोकमत’ परिवाराशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यात सर्वत्र वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे. अपघाती मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. कोल्हापूरच्या वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावून येथील रस्ते सुरक्षित बनविण्यासाठी आपला प्रयत्न राहील. वाहतूक समस्येसंबंधी स्थानिक लोकांशी चर्चा करून उपाययोजना राबविल्या जातील. वाहतुकीच्या प्रश्नावर काम करीत असताना एक जीव वाचला तर ते माझ्या कामाचे यश असेल. नागरिकांशी संवाद साधून काम केले जाईल. पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल. माझे बालपण कोल्हापुरात गेल्याने येथील राजकीय, सामाजिक, भौगोलिक परिस्थितीची माहिती आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडून काढण्याचा आपला प्रयत्न राहील. त्यांच्यासोबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक तानाजी सावंत, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक अशोक धुमाळ उपस्थित होते.
वाहतूक पोलिस खाकीचा कणा
वाहतूक पोलिस हा खाकीचा कणा आहे. चार भिंतींच्या आत कोण कसा तपास करतो हे दिसून येत नाही; परंतु रस्त्यावर नागरिकांना अडवून वाहतूक शाखेचा पोलिस पैसे घेत असेल तर थेट पोलिस अधीक्षकांची बदनामी आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांचा कारभार पारदर्शक बनविण्यासाठी आपले प्रयत्न राहतील, असेही मोहिते यांनी सांगितले.
बंद सिग्नल सुरू करणार
शहरात चोवीस वाहतूक सिग्नल आहेत. त्यापैकी चार नादुरुस्त आहेत. गेल्या सात-आठ वर्षांपासून बंद असलेला गंगावेस येथील सिग्नल सुरू केला आहे. या चौकातील अतिक्रमण हटवून सुस्थितीत सिग्नल सुरू केल्याने या मार्गावर होणारी वाहतूक कोंडी दूर झाली आहे. राजारामपुरी माऊली पुतळा चौकात सिग्नल सुरू करण्यात येणार आहे. शहरातील सर्व सिग्नल सुरू करून एकेरी मार्ग वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे मोहिते यांनी सांगितले.