Kolhapur: इचलकरंजीत भाजपचा आमदार केल्यास सुरेश हाळवणकर विधान परिषदेवर - चंद्रशेखर बावनकुळे 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 01:55 PM2024-10-18T13:55:13+5:302024-10-18T13:56:08+5:30

'तुम्ही नेता म्हणून मला मान्य केले असेल, तर मी मान्य केलेला निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल'

If Ichalkaranjit BJP MLA Suresh Halvankar on Legislative Council says Chandrasekhar Bawankule | Kolhapur: इचलकरंजीत भाजपचा आमदार केल्यास सुरेश हाळवणकर विधान परिषदेवर - चंद्रशेखर बावनकुळे 

Kolhapur: इचलकरंजीत भाजपचा आमदार केल्यास सुरेश हाळवणकर विधान परिषदेवर - चंद्रशेखर बावनकुळे 

इचलकरंजी : इचलकरंजीत भाजपचा आमदार निवडून आणा. पक्षात निष्ठेला न्याय दिला जातो. आपले सरकार आल्यावर सुरेश हाळवणकर यांना विधान परिषदेवर संधी देणार, असा निरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. आवाडे-हाळवणकर यांची एकसंध ताकद लागल्यास जिल्ह्यात पक्षवाढीसाठी बळ मिळेल, असेही ते म्हणाले.

आवाडे पिता-पुत्र यांच्या प्रवेशाने नाराज झालेल्या भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांची समजूत काढण्यासाठी बावनकुळे इचलकरंजीत आले होते. यावेळी सहकार खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार धनंजय महाडिक, भाजप संघटनमंत्री मकरंद देशपांडे, राजेश पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

बावनकुळे म्हणाले, विधानसभेत कसे चांगले काम करायचे, याचे उदाहरण म्हणजे हाळवणकर आहेत. त्यांच्या निष्ठेला मी सलाम करतो, असे म्हणत हाळवणकर यांची स्तुती करून आपल्याला राज्यातील जनतेला आणि कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी सत्ता हवी आहे. त्यासाठी पक्षाने घेतलेल्या निर्णयासोबत राहा. भाजप हा पक्ष सर्वांना न्याय देतो. थोडा वेळ लागेल; पण हाळवणकर यांना न्याय मिळेल, असे सांगत पक्ष प्रवेशावेळी आवाडे यांना शब्द दिला आहे. म्हणून त्यासाठी हाळवणकर यांना मागे ठेवले जाणार नाही, असे सांगत कार्यकर्त्यांची समजूत काढली.

मंत्री मोहोळ म्हणाले, त्याग करणे हे बोलणे सोपे असते, भोगणे अवघड असते. त्यामुळे आपल्या नेत्याने घेतलेली भूमिका समजावून घ्या आणि पक्षाच्या कार्यात सहभागी व्हा. भाजप सर्वसामान्याला न्याय देणारी पार्टी आहे. आपणालाही मिळेल; परंतु सध्या एक-एक सीट महत्त्वाची आहे.

हाळवणकर म्हणाले, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे मी निर्णय घेतला आहे. तुम्ही नेता म्हणून मला मान्य केले असेल, तर मी मान्य केलेला निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. आवाडे यांनी परस्पर मुलाखती देणे बंद कराव्यात. ते सध्या लाडक्या मुलाला लाँच करीत आहेत. पक्षाच्या विचारसरणीसोबत जोडून जर ते राहिले, तर महाराष्ट्रात विक्रमी मतांनी विजय होईल. चांगले समीकरण जुळले, तर जिल्हा परिषद, पंचायत समिती यासह महापालिकेत पहिला महापौर भाजपचा असेल.

शहराध्यक्ष अमृत भोसले यांनी स्वागत केले. यावेळी बेळगावचे माजी आमदार संजय पाटील, जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर, माजी नगराध्यक्षा अलका स्वामी, अशोक स्वामी, मिश्रीलाल जाजू, अनिल डाळ्या, ऋषभ जैन, आदी उपस्थित होते.

कार्यकर्त्यांनी दाखवले फलक

हाळवणकर समर्थक कार्यकर्त्यांनी निष्ठेला हाच का न्याय, असे लिहिलेले आणि त्यावर हाळवणकर यांचा फोटो असलेला डिजिटल फलक हातात घेऊन सभेत फेरफटका मारला. पक्ष शिस्तमध्ये हे बसत नसल्याचे बावनकुळे आणि हाळवणकर यांनी या कार्यकर्त्यांना फलक बाजूला ठेवण्याची सूचना केली.
 

Web Title: If Ichalkaranjit BJP MLA Suresh Halvankar on Legislative Council says Chandrasekhar Bawankule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.