अंतराची अट रद्द झाल्यास पहिला कारखाना आपलाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 12:31 AM2017-08-07T00:31:08+5:302017-08-07T00:31:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
उदगाव : शासनाने दोन साखर कारखान्यांतील अंतराची अट रद्द केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना पहिला साखर कारखाना उभारेल. राज्यात कारखान्यामध्ये होत असलेल्या काटामारीमुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे ज्या गावात ग्रामपंचायत जागा उपलब्ध करून देईल त्या जागेवर वजनकाटा उभारणार आहे. शेतकºयांना कर्जमाफी मिळावी या ‘स्वाभिमानी’च्या रेट्यामुळे शासनाने ३४ हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली. मात्र, त्याचा लाभ शेतकºयांना झाला नाही. त्यामुळे राज्य व केंद्र शासनाने शेतकºयांचा सात-बारा कोरा करावा, या मागणीसाठी ३० आॅगस्टपासून देशव्यापी आंदोलन उभारणार असल्याचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
उदगाव येथे रविवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मेळाव्यात खा. शेट्टी बोलत होते. ते पुढे म्हणाले, अच्छे दिनची स्वप्ने दाखवून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने शेतकºयांचा सात-बारा कोरा केला नाही, तर शेतकरी तुम्हाला खुर्चीवरून खाली खेचतील. शेतकºयांच्या मालाला हमीभाव व कर्जमाफी देऊन शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत, अन्यथा ३० आॅगस्टपासून जम्मू-काश्मीर येथून देशव्यापी आंदोलन उभारणार असल्याचे सांगून सध्या होऊ घातलेल्या नगरपालिका, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रत्येक कार्यकर्त्याने पुढे यावे व स्वाभिमानीचा झेंडा फडकवावा, असे आवाहन खा. शेट्टी यांनी यावेळी केले.
यावेळी महिला बालकल्याण सभापती शुभांगी शिंदे, जि. प. सदस्य पद्माराणी पाटील, मन्सूर मुल्लाणी, माजी जि. प. सदस्य सावकार मादनाईक, मिलिंद साखरपे, रामचंद्र फुलारे, आदिनाथ हेमगिरे, राजगोंडा पाटील, भगवान काटे, बंडू पाटील, सुवर्णा अपराज, वैशाली पाटील, सुरेश कांबळे, कल्पना मस्के, शैलेश आडके, शांताराम पाटील, प्रकाश बंडगर, शिवाजी कोळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
सदाभाऊंचा निर्णय समितीच घेईल
मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर कारवाईचा निर्णय समितीच घेईल. मंत्री खोत यांच्याशी वैयक्तिक मतभेद नाहीत, तर शेतकºयांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्हाला लढायचे आहे. भाजप सत्तेत मी फक्त शेतकºयांचे प्रश्न सोडविण्यासाठी गेलो आहे. त्यामुळे मला कोणत्याच मंत्रिमंडळावर जायचे नाही. शेतकरी बिल्ल्यावर प्रतिष्ठा ठेवून आपल्याबरोबर आहेत, त्यामुळे विचार करून निर्णय घ्या, असा चेंडू खा. शेट्टींनी सदाभाऊंच्याकडे टोलविला. त्यांचा निर्णय समितीच घेईल, असे खा. शेट्टी यांनी सूचित केले.
सदाभाऊविना सभा
खासदार शेट्टी यांनी स्वाभिमानी संघटनेची स्थापना केल्यापासून ‘स्वाभिमानी’च्या प्रत्येक मेळाव्याला खोत उपस्थित असायचे. त्यांचे रांगडे भाषण ऐकण्यासाठी शेतकरी आवर्जून येत असत. मात्र, रविवारी झालेली सभा सदाभाऊ खोत यांच्याविनाच पार पडली.