कवाळे स्थायीचे तर, उत्तुरे परिवहन सभापती, महिला बाल कल्याण सभापती शोभा कवाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 03:19 PM2020-02-11T15:19:48+5:302020-02-11T15:25:58+5:30
कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी संदीप शिवाजी कवाळे, परिवहन समिती सभापतीपदी प्रतिज्ञा महेश उत्तुरे तर महिला बालकल्याण समिती सभापतीपदी शोभा धनाजी कवाळे यांची निवड झाली.
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी संदीप शिवाजी कवाळे, परिवहन समिती सभापतीपदी प्रतिज्ञा महेश उत्तुरे तर महिला बालकल्याण समिती सभापतीपदी शोभा धनाजी कवाळे यांची निवड झाली.
मंगळवारी छत्रपती ताराराणी सभागृहात पिठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत विशेष बैठकीत या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
प्रथम स्थायी समिती सभापतीपदासाठी निवडणुक झाली. राष्ट्रवादीचे संदीप शिवाजीराव कवाळे व भाजपचे विजयसिंह पांडूरंग खाडे- पाटील यांचे अर्ज दाखल झाले होते. कवाळे यांना १० तर खाडे-पाटील यांना ६ मते पडली.
परिवहन सभापतीपदासाठी शिवसेनेच्या प्रतिज्ञा महेश उत्तुरे यांना आठ तर ताराराणीचे महेश यशवंत वासूदेव यांना पाच मते पडली. महिला व बालकल्याण समिती सभापतीपदासाठी कॉँग्रेसच्या शोभा धनाजी कवाळे यांना पाच तर भाजपच्या भाग्यश्री उदय शेटके यांना तीन मते पडली. या निवडीवेळी नगरसेविका स्मिता माने या गैरहजर होत्या. उपसभापतीपदासाठी वहिदा सौदागर यांनी रुपाराणी निकम यांचा पाच विरुध्द तीन मतांनी पराभव केला. पिठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी तिन्ही निवडी घोषित केल्या.
यावेळी महापौर निलोफर आजरेकर, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, नगरसचिव दिवाकर कारंडे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविकांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. निवडीनंतर फटकांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत नूतन सभापतींची त्यांच्या प्रभागात मिरवणुक काढण्यात आली.