महाडिकांनी भ्रष्टाचार केला असेल तर गुन्हे दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:31 AM2021-06-09T04:31:32+5:302021-06-09T04:31:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गोकूळ दूध संघामध्ये माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी जर खरोखरच भ्रष्टाचार केला असेल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गोकूळ दूध संघामध्ये माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी जर खरोखरच भ्रष्टाचार केला असेल तर पालकमंत्र्यांनी गुन्हे दाखल करावेत, असे आव्हान संघाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी सोमवारी रात्री प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिले. उत्पादकांना दोन रुपये जास्त दर देणार होता, त्यास विलंब का होत आहे अशीही विचारणा त्यांनी केली आहे.
पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी दुपारी संघाच्या गोकूळ शिरगांव येथील कार्यालयात जावून आढावा बैठकीत घेतली व महाडिक यांनी दहा वर्षात वाहतूक भाड्यापोटी १३४ कोटी रुपये घेतले असल्याचा आरोप केला. त्याचे स्पष्टीकरण महाडिक यांनी या पत्रकात केले आहे. त्या म्हणतात, आम्हाला कधीच या गोष्टी लपवण्याची गरज वाटली नाही. जे काही आहे ते समोर आहे व पारदर्शी आहे. महाडिक यांनी सेवा देऊन बिले घेतली आहेत आणि यामध्ये काही खोटे असेल, भ्रष्टाचार असेल तर गृहराज्यमंत्री असणाऱ्या पाटील यांनी थेट गुन्हे दाखल करावेत. माध्यमांसमोर बोलण्यापेक्षा गुन्हे दाखल कराच, त्याला सामोरे जायची आमची तयारी आहे. विद्यमान अध्यक्षांनीही संघात अजून कोणाकोणाचे टँकर आहेत याचीही माहिती द्यावी.
पालकमंत्री पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी संघात हुकूमशाही कारभार होता, अशी टीका केली आहे. तसा कारभार होता तर त्यांना पहिल्याच पत्रकार परिषदेत बिलांची माहितीचा कागद तरी मिळाला असती का..? आम्ही व्यवसाय व्यवसायाच्या जागीच ठेवला. हुकूमशाही कारभार पाहायचा असेल तर त्यांनी स्वत:च्या गगनबावडा साखर कारखान्याच्या कामकाजाकडे पाहावे. ज्याचा अहवाल कधी समोर येत नाही. अशांनी सरळमार्गाने जाणाऱ्यांना डिवचण्याच्या भानगडीत पडू नये.