आईने मोपेडवरचा प्रवास टाळला असता तर...!
By admin | Published: June 15, 2016 12:36 AM2016-06-15T00:36:39+5:302016-06-15T00:37:23+5:30
देवकर पाणंद हळहळला : ‘मम्मी कुठायं?’ मुलांच्या प्रश्नांनी कुटुंबीय गहिवरले
कोल्हापूर : त्यांची स्वत:ची आईही त्यांना जीव तोडून सांगत होती, ‘बाई, इतक्या लांबचा प्रवास आहे. मोपेडवरून जाऊ नकोस...’ पती अरुण हे तर माहेरी जातानाच गाडी घेऊन जायला विरोध करत होते. तरीही त्यांनी का कुणास ठाऊक, मोपेडवरून कऱ्हाडहून येणे पसंत केले. ही छोटीशीच चूक; परंतु ती एका कुटुंबावर दु:खाचा आघात करून गेली. मंगळवारी दिवसभर प्रत्येकाच्या तोंडात हेच होते. त्या मोपेड घेऊन गेल्या नसत्या तर?...
राष्ट्रीय महामार्गावर शिये फाट्याजवळील दुर्गामाता धाब्याजवळ झालेल्या अपघातात सुवर्णा कोपार्डेकर यांचा जागीच मृत्यू झाला. भूमी व देवराज ही त्यांची मुले गंभीर जखमी झाली. भूमी देशमुख हायस्कूलमध्ये सहावीत शिकते; तर देवराज हा सिद्धेश्वर विद्यालयात दुसरीत शिकतो. त्यांची आज, बुधवारपासून शाळा सुरू होते म्हणून आई सुवर्णा त्यांना घेऊन येत असताना नियतीने मुलांची व आईची ताटातूट केली. मंगळवारी दिवसभर दोन्ही मुले प्रत्येकाला ‘आमची मम्मी कुठे आहे?’ म्हणून विचारत होती. त्यांची समजूत काढताना कुटुंबीयांच्या डोळ्यांत अश्रू अनावर होत होते. सुवर्णा कोपार्डेकर यांच्यावर सायंकाळी सहाच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. तुमच्या आईला जास्त दुखापत झाल्यामुळे त्यांना दुसऱ्या दवाखान्यात ठेवले असल्याचे मुलांना दिवसभर सांगण्यात येत होते.
कोपार्डेकर कुटुंबीय देवकर पाणंदमध्ये राहणारे. अरुण कोपार्डेकर पूर्वी केबलचा व्यवसाय करीत होते. अलीकडे ते वाहनचालक म्हणून काम करीत आहेत. सुवर्णा या शिवणकाम करीत होत्या. सामान्य परंतु सुखी-समाधानी कुटुंब. आठ दिवसांपूर्वी सुवर्णा मोपेडवरूनच माहेरी कऱ्हाडला गेल्या होत्या. मुलांच्या शाळा सुरू होणार म्हणून त्या सकाळी सव्वाआठच्या सुमारास कोल्हापूरला निघाल्या. सकाळीही त्यांना त्यांच्या आई ‘गाडीवरून जाऊ नकोस बाई’ असा आग्रह करत होत्या. पतीही तेच सांगत होते; परंतु ‘सकाळी वाहतूक जास्त नसते; त्यामुळे येते शिस्तीत...’ असे सांगून त्या निघाल्या. किणी टोलनाक्यावर आल्यावर त्यांनी पतीला फोनही केला. ‘मला कशाने भीती वाटते हो...’
कोरेगावच्या ‘मानसिंग’ची माणुसकी
कोरेगावचा मानसिंग पाटील हा तरुण अपघातग्रस्त मोपेडच्या मागेच होता. तो अशोक लेलँडमध्ये नोकरीस आहे. अपघात झाल्यावर त्याने तातडीने मोटारसायकलवरून उडी मारून रस्त्यावर पडलेल्या दोन्ही मुलांना उचलून रस्त्यातून बाजूला घेतले. पोलिसांना अपघाताची माहिती दिली. जखमी मुलांना घेऊन तो स्वत: सीपीआर रुग्णालयात आला. त्यांच्यावर उपचार होईपर्यंत तो थांबून होता. त्याने केलेल्या माणुसकीच्या मदतीमुळे किमान मुलांवर वेळेत उपचार होणे तरी शक्य झाले.