मुश्रीफ यांनी नुसता पायावर पाय दिल्यास उठायला येणार नाही -दोन्ही काँग्रेसचे प्रत्युत्तर : लस विलंबासाठी मोदीच जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:18 AM2021-07-01T04:18:06+5:302021-07-01T04:18:06+5:30
कोल्हापूर : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी तुमच्या नुसता पायावर पाय जरी दिला तरी तुम्ही आठ दिवस अंथरुणातून उठणार नाही. ...
कोल्हापूर : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी तुमच्या नुसता पायावर पाय जरी दिला तरी तुम्ही आठ दिवस अंथरुणातून उठणार नाही. त्यामुळे त्यांचे वजन पावशेर आहे की, शंभर किलो हे तपासण्याच्या फंदात पडू नका, असा टोला दोन्ही काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी बुधवारी भाजपच्या कार्यकर्त्यांना लगावला. बालिश विधाने यापुढे खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी गटनेते शारंगधर देशमुख, सचिन चव्हाण, राजेश लाटकर, विनायक फाळके, आदिल फरास आदी प्रमुखांनी हे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. तीन मंत्री असतानाही जिल्ह्यात लसीकरणाचा बट्टाबोळ सुरू असल्याची टीका भाजपच्या महेश जाधव, राहुल चिकोडे आदींनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन केली होती. त्यास दोन्ही काँग्रेसने प्रत्युतर दिले आहे. त्यात म्हटले आहे,
अपयशी ठरलेल्या लसीकरण धोरणाला पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार आहेत. लसीचे वाटप केंद्र सरकारच्या हातामध्येच आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या, बाधितांचे प्रमाण व मृत्यूचे प्रमाण पाहता लसीचे डोस त्या प्रमाणात मिळाले पाहिजे होते. परंतु लोकसंख्या, बाधितांचे प्रमाण इत्यादी बाबी महाराष्ट्रपेक्षा अत्यंत कमी असतानासुद्धा गुजरात, कर्नाटक या राज्यांना महाराष्ट्रपेक्षा जादा लसीचे डोस दिले जात आहेत. हे कशाचे निदर्शक आहे? त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने करण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या घरासमोर निदर्शने करावीत.
तारीख तुम्हीच द्या...
ओबीसी आरक्षणामध्ये पाच वर्षांची फार मोठी संधी असतानाही कृती केली नाही. २०११ च्या जनगणनेचा इम्पिरिकल डाटा केंद्र शासनाकडे आहे; परंतु तो देऊ नये असेच प्रयत्न माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. ‘महाराष्ट्राची सत्ता द्या, तो डाटा मिळवतो’, हे श्री. फडणवीस यांचे वक्तव्य कशाचे द्योतक आहे? ज्याप्रमाणे राज्यपालांनी विधानपरिषदेची यादी रखडवली त्याप्रमाणे ओबीसीबाबत घडत आहे. त्यामुळे, एकाच व्यासपीठावर येण्याची तारीख भाजपने द्यावी, आमचे नेते सदैव तयार आहेत.