परिचारकांवर कारवाई न केल्यास आंदोलन
By admin | Published: March 1, 2017 12:54 AM2017-03-01T00:54:36+5:302017-03-01T00:54:36+5:30
आजी-माजी सैनिकांचा इशारा : तावडे हॉटेल येथे रास्ता रोको
शिरोली : भारतीय सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबत अपशब्द वापरणारे पंढरपूरचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या आमदारकीचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. अन्यथा, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यातील आजी-माजी सैनिक संघटनांनी दिला.
तावडे हॉटेल येथे सकाळी अकरा वाजता या संघटनांनी रास्ता रोको केला. आंदोलनाचे नेतृत्व कोल्हापूर जिल्हा सैनिक संघटनेचे अध्यक्ष एन. एन. पाटील (सांगवडेकर) यांनी केले.
यावेळी आमदार परिचारकांच्या निषेधार्थ घोषणा देत आजी-माजी सैनिक रस्त्यावर उतरले.
यावेळी आंदोलकांनी सुमारे तीस मिनिटे रास्ता रोको केला.
पाटील म्हणाले, आमदार प्रशांत परिचारक यांनी देशाचे रक्षण करणारे सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अपशब्द वापरले आहेत. देशाच्या रक्षणासाठी आम्ही सज्ज आहोत आणि सीमेवर असताना आमच्या कुटुंबीयांवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे कुणी ऐऱ्यागैऱ्याने आमच्या कुटुंबावर शिंतोडे उडवू नयेत. सीमेवर आम्ही देशाचे रक्षण करतो. आमच्या कुटुंबाविषयी अपशब्द वापरणाऱ्या आमदार परिचारकांच्या निलंबनासाठी जनतेने आमच्या पाठीशी उभे राहावे.
यावेळी कॅप्टन कृष्णात गुरव म्हणाले, अशा आमदारांना पाठीशी घालू नये. शासनाने अशा आमदारांचा तत्काळ राजीनामा घ्यावा. आमदार परिचारक यांच्यावरती शासनाने वेळेत कारवाई करावी, नाहीतर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला. आंदोलनात कर्नल विजयसिंह गायकवाड, चंदनसिंह नवजाद, बी. एस. पाटील, चंद्रकांत पाटील, आनंदा पाटील, सुभेदार राजाराम पाटील, वसंत चौगुले, जे. डी. साबळे, जी. टी. पाटील, मारुती पाटील, साताप्पा देवेकर, मनोहर निकम, कुतूब मुजावर, संभाजी माने, एच. बी. पाटील, मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंत मुळीक यांच्यासह सैनिकांच्या कुटुंबातील सदस्य आंदोलनात सहभागी झाले.