काहीच केलं नाही तर जिल्हा मंडलिकांच्या पाठीशी कसा; वैशाली मंडलिक यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:43 AM2019-04-20T00:43:31+5:302019-04-20T00:43:46+5:30
कोल्हापूर : मंडलिकांनी या जिल्ह्यासाठी काहीच केले नाही, असा सध्या प्रचार सुरू आहे. जर मंडलिकांनी काहीच केले नसेल, तर ...
कोल्हापूर : मंडलिकांनी या जिल्ह्यासाठी काहीच केले नाही, असा सध्या प्रचार सुरू आहे. जर मंडलिकांनी काहीच केले नसेल, तर या कोल्हापूर जिल्ह्यातील जनता आता तन, मन, धनाने संजय मंडलिक यांच्या पाठीशी का उभी राहिली, असा सवाल शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या पत्नी वैशाली मंडलिक यांनी शुक्रवारी उपस्थित केला.
त्या म्हणाल्या, मंडलिक साहेबांनी इतकी वर्षे राजकारणात काढली; परंतु त्यांनी काही तत्त्वे बाळगून राजकारण केले. आज ते हयात नसताना त्यांच्यावर टीका करणे, हे शोभणारे नाही. खासदारांचा मुलगा म्हणून म्हणून मला आयते पद द्या, अशी मागणी संजय यांनी कधीच केली नाही आणि मोठ्या साहेबांनीही तू तुझ्या पायावर उभा राहा, अशीच शिकवण त्यांना दिली. आज मुरगूडच्या शिक्षण संस्थेचा कारभार ते उत्तमपणे पाहत आहेत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना प्रशासनाला शिस्त लावली. ९० कोटींहून अधिक निधीची विकासकामे केली. राज्यात नावाजलेला साखर कारखाना ते चालवत आहेत. मुरगूड नगरपालिका ताब्यात आहे. हे सर्व संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखालीच सुरू आहे, याची जाणीव जनतेला आहे.
याउलट विद्यमान खासदारांचा काही कोटींचा निधी परत गेला, याचे उत्तर कोण देणार ? महाडिक ८ हजार कोटी रुपयांची विकासकामे केल्याचे सांगत आहेत; पण कुठलाच सत्ताधारी पक्ष विरोधी खासदाराला इतका निधी कसा देईल? ही साधी विचार करण्याजोगी गोष्ट आहे.
केंद्रातील मोदी सरकारने सातारा, कागलच्या राष्ट्रीय महामार्गासाठी लावलेला निधी तुमच्या निधीमध्ये तुम्ही कसा धरू शकता. ते क्रेडिट केंद्र सरकारचे, मोदींचे, नितीन गडकरींचे आहे.
संजय मंडलिक यांना स्वत:चा उदो उदो करणे आणि केलेल्या कामाचे मार्केटिंग करणे आवडत नाही; त्यामुळे त्यांनी के लेली अनेक कामे पडद्याआड राहिली. लातूरच्या भूकंपानंतर त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी त्या परिसरात एक महिना राहून, एक गाव वसवण्यासाठी मदत केली. हे त्यांनी कुठे सांगितले नाही; त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून कोल्हापूरची सुज्ञ जनता संजय मंडलिक यांच्या पाठीशी राहील, असा विश्वास वाटतो.
महाडिकांना दिशा दिली
वैशाली मंडलिक म्हणाल्या, मोठ्या साहेबांकडून धनंजय महाडिक यांचा २00४ ला लोकसभेला पराभव झाला. त्यानंतर धनंजय महाडिक हे साहेबांचे अभिनंदन करायला हार घेऊन आले. तेव्हा साहेब त्यांना म्हणाले, तू बिझनेसमन आहेस. तुझी स्वत:ची राजकारणामध्ये ताकद तयार कर; त्यासाठी युवाशक्ती एकत्र कर. खानविलकर वहिनींनी महिला बचत गट तयार केले आहेत. त्यांच्याकडे जाऊन ये. तसे महिला बचत गट तयार कर; त्यासाठी तुझ्या पत्नीला पुढे आण. तुमच्या आयुष्यालाच मंडलिक साहेबांनी दिशा दिली.
अरुंधती, तुम्हाला महिलांचे मन समजलं नाही
घरातल्या घरात एकाच रंगाची साडी असेल तर ते महिलांना आवडत नाही. इथे तर तुम्ही एकाच गल्लीत एकाच रंगाच्या व साध्या काठापदराच्या साड्या दिल्यात, ते त्यांना आवडेल का..? बायकांचे मन तुम्हाला कसं समजलं नाही, अशी विचारणा मंडलिक यांनी केली.