पक्षाने आदेश दिल्यास ‘उत्तर’मधून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 12:25 AM2018-06-04T00:25:27+5:302018-06-04T00:25:27+5:30
कोल्हापूर : ‘उत्तर’मधून महेश जाधव, सत्यजित कदम यांच्यापैकी कोणी लढायचे हे ठरलेले नाही, सुहास लटोरे यांचेही नाव येऊ शकते. त्यामुळे सगळ्यांनीच ताकदीने काम करायचे. माझ्यासह मधुरिमाराजे व आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांच्याही नावांची चर्चा आहे; पण आपण निवडणूक लढविण्यास इच्छुक नाही. आपण कोरे पाकीट आहे. त्याने कुठे जायचे हे त्यावर लिहिणाऱ्यांच्या हातात असते. पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला तर कदाचित मलाही लढावे लागेल, असे संकेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
भाजपच्या ‘उत्तर’ विधानसभा मतदारसंघातील बूथ प्रमुखांचा मेळावा रविवारी आयर्विन ख्रिश्चन हॉलमध्ये झाला. त्यावेळी ते बोलत होते. मंत्री पाटील म्हणाले, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकेसह ‘हुपरी’ व ‘आजरा’ नगरपंचायतीही भाजपने जिंकल्याने आमचा आत्मविश्वास वाढला आहे. विचारपूर्वक सांगतो, ‘भाजप ठरवेल ते खासदार आणि म्हणेल तोच आमदार होईल,’ असेही त्यांनी सांगितले.
पश्चिम महाराष्टÑ देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शहरात केलेल्या कामांची माहिती घरोघरी पोहोचवून पक्ष बळकटीसाठी कामाला लागा. महानगर अध्यक्ष संदीप देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आमदार सुरेश हाळवणकर यांनी सरकारच्या योजनांची माहिती दिली. ‘गोकुळ’चे संचालक बाबा देसाई, स्थायी समिती सभापती आशिष ढवळे, विजय सूर्यवंशी, राहुल चिकोडे, सुभाष रामुगडे, आदी उपस्थित होते.
उत्तर प्रदेश, कर्नाटक यशाचे गमक
एका बुथामध्ये मृत, स्थलांतरित वजा जाता साधारणत: दोनशे घरांमधील आठशे मतदान होते. दहा कार्यकर्त्यांना प्रत्येकी २० घरे येणार आहेत. त्यांनी महिन्याला प्रत्येकाच्या घरी जाऊन भेटायचे, अडचणी समजावून घ्यायच्या, त्यांना मदत करायची. लोकसभेपर्यंत १२ वेळा, तर विधानसभेपर्यंत १८ वेळा तुम्ही त्या घरात जाणार असल्याने आपोआपच आपुलकी निर्माण होऊन त्याचे रूपांतर मतदानात होईल. हेच काम उत्तर प्रदेश व कर्नाटकात केल्याने यश मिळाल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.
पाच-सहा महिन्यांत बºयाच घडामोडी
‘उत्तर’ची तयारी नेटाने सुरू केली असून रोज एका नगरसेवकाला बोलावून घेऊन स्वतंत्र चर्चा करतो. पाच-सहा महिन्यांत कोण कुठे जाऊन बसणार आहे, हे मला चांगले माहिती आहे. त्यामुळे निवडणूक अधिक सोपी होईल, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.
पास झालेल्यांचे अभिनंदन
बूथ कार्यकर्त्यांनी घराघरांपर्यंत जाऊन संपर्क मोहीम राबविण्याचा मंत्र देऊन पाटील म्हणाले, दहावी-बारावीचे निकाल लागले की पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन अभिनंदन करा, नापास झालेल्यांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन करा.