बंडखोरी केल्यास आवाडेंना पाठिंबा
By Admin | Published: December 11, 2015 12:47 AM2015-12-11T00:47:36+5:302015-12-11T00:54:12+5:30
महादेवराव महाडिक : अनेकांच्या भेटी व चर्चेतून निर्णय; विधान परिषद निवडणूक
इचलकरंजी : विधान परिषद निवडणुकीमध्ये प्रकाश आवाडे व आपण अशा दोघांनाही कॉँग्रेस पक्षाने उमेदवारी दिलेली नाही. मी निवडणूक लढविण्याची तयारी केली असली तरी आवाडे बंडखोरी करणार असतील तर मी त्यांना पाठिंबा देईन, असे प्रतिपादन आमदार महादेवराव महाडिक यांनी गुरुवारी येथे केले.
विधान परिषदेसाठी अपक्ष म्हणून बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आमदार महाडिक यांनी प्रथमत: इचलकरंजीस भेट दिली. गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्यांनी विधान परिषदेसाठी अर्ज भरणाऱ्या येथील शहर विकास आघाडीच्या उमेदवार ध्रुवती दळवाई यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी शहर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अजित जाधव, कार्याध्यक्ष जयवंत लायकर, निमंत्रक तानाजी पोवार, आदींसह अन्य नगरसेवक उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार महाडिक म्हणाले, कॉँग्रेसकडे आम्ही तिघांनी (पी. एन. पाटील, महाडिक व आवाडे) उमेदवारी मागितली होती. तिघांपैकी कोणाला उमेदवारी मिळेल, त्यास अन्य दोघे पाठिंबा देतील, असे पक्षश्रेष्ठींना सांगितले होते; पण तिघांनाही डावलण्यात आले. कॉँग्रेसने माझ्यावर अन्याय केला. त्यामुळे मला बंडखोरी करावी लागली. मात्र, मला कॉँग्रेससह सर्व पक्षांतील मतदारांचा पाठिंबा मिळतो आहे. प्रतिस्पर्ध्यापेक्षा एक तरी मत मला जास्त मिळेल आणि माझा विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (पान ४ वर)
सतेज यांचे आवाडेंच्या माघारीसाठी प्रयत्न
कोल्हापूर : विधान परिषद निवडणुकीतून माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी माघार घ्यावी, यासाठी काँग्रेसचे या निवडणुकीतील उमेदवार सतेज पाटील यांच्याकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी त्यांनी बुधवारी अर्ज दाखल
केल्यानंतर लागलीच मुंबई गाठली आहे. / वृत्त ४
आवाडे पिता-पुत्रांची भेट झाली नाही
गुरुवारच्या इचलकरंजी भेटीच्या दरम्यान आमदार महाडिक यांनी माजी मंत्री प्रकाश आवाडे व माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांचीही भेट घेण्याचा प्रयत्न केला. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे हे दिल्लीमध्ये असल्यामुळे, तर प्रकाश आवाडे हे कौटुंबिक कार्याच्या निमित्ताने बाहेर असल्याने दोघेही निवासस्थानी त्यांना भेटू शकले नाहीत.
यड्रावकर यांच्या माघारीबाबत आज निर्णय
छाननीत सर्व बाराही उमेदवारांचे अर्ज वैध