पुनर्वसनाची बैठक निष्फळ झाल्यास घळभरणी बंद पाडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:21 AM2021-03-19T04:21:44+5:302021-03-19T04:21:44+5:30
उत्तूर : ‘आधी पुनर्वसन मग धरण’ हा कायदा असताना आंबेओहळ प्रकल्प (ता. आजरा) येथील धरणाच्या घळभरणीचे काम पोलीस बंदोबस्तात ...
उत्तूर : ‘आधी पुनर्वसन मग धरण’ हा कायदा असताना आंबेओहळ प्रकल्प (ता. आजरा) येथील धरणाच्या घळभरणीचे काम पोलीस बंदोबस्तात सुरू आहे. याचा विरोध करण्यासाठी जमलेल्या धरणग्रस्तांना प्रशासनाने बैठकीचे आश्वासन दिले. आज होणाऱ्या पुनर्वसनाच्या बैठकीत योग्य मार्ग न निघाल्यास प्रकल्पाचे काम बंद पाडण्याचा इशारा आर्दाळ (ता. आजरा) येथील बैठकीत धरणग्रस्तांनी दिला. कॉ. संपत देसाई म्हणाले, कायदा धरणग्रस्तांनी मोडला नाही. निवेदने देऊनही बैठक घेण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. धरणाचे काम ८५ टक्के असताना पुनर्वसनाचे काम कासवगतीने सुरू आहे. धरणग्रस्तांच्या मागण्या मान्य न झाल्यास धरणाचे काम बंद पाडल्याशिवाय शासन जागे होणार नाही. म्हणून आपण एकत्र आलो आहोत.
सागर सरोळकर म्हणाले, प्रकल्पग्रस्तांचे समाधानकारक पुनर्वसन झाले नाही. संकलन दुरुस्ती अद्यापही झाले नाही. बेकनाळ, लिंगनूर, गडहिंग्लज येथील जमिनी जाणीवपूर्वक दाखवल्या जात नाहीत. नाकारलेल्या जमिनी पुन्हा पुन्हा दाखवल्या जात आहेत.
राजू देशपांडे म्हणाले, १२४५ धरणग्रस्त असताना ८२२ धरणग्रस्त कसे झाले. नागरी सुविधांसह एकाही धरणग्रस्ताचे १०० पुनर्वसन झाले नाही. कॉ. संजय तर्डेकर, पं. स. सदस्य बाळेश नाईक, सदानंद व्हनबट्टे, शिवाजी गुरव यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सचिन पावले, अमोल बांबरे, महादेव खाडे, मधुकर पोटे आदींसह धरणग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, प्रकल्पाकडे जाणाऱ्या धरणग्रस्तांना आर्दाळ येथे अडवले व धरणाकडे जाऊ नका, अशी विनंती पोलीस निरीक्षक बालाजी भांगे, तहसीलदार विकास अहिर यांनी केली. यावर धरणग्रस्तांनी पुनर्वसनाबाबत लेखी बैठकीची मागणी केली.
तहसीलदार विकास अहिर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन केले असल्याचे सांगितले. पुनर्वसनाची चर्चा निष्फळ ठरल्यास काम बंद पाडण्याचा इशाराही धरणग्रस्तांनी दिला.
- आर्दाळला पोलीस छावणीचे स्वरूप
आर्दाळ येथे परिसरातील गावातील धरणग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे गावात मोठा पोलीस बंदोबस्त होता. पुन्हा अटकाव होईल या भीतीने काही धरणग्रस्त फिरकलेच नाहीत. धरण परिसर व आर्दाळ गावात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
-----------------------
* माझ्यांनी विश्वासघात करू नये. भाषणात प्रत्येक चळवळींतील नेत्यांनी बेकायदेशीर काम ग्रामविकासमंत्र्यांनी सुरू करण्यास सांगितल्याचा आरोप केला. आपण १० वर्षे सत्तेत असताना प्रश्न का सुटला नाही. कायदा का मोडला ? असा प्रश्न विचारून मंत्री महोदयांनी धरणग्रस्तांना दिलासा द्यावा विश्वासघात करू नये, अशी मागणी धरणग्रस्तांनी केली.
---------------------------
फोटो ओळी : आर्दाळ (ता. आजरा) येथे तहसीलदार विकास अहिर, पोलीस निरीक्षक बालाजी भांगे धरणग्रस्तांना पुनर्वसनाची बैठक होत असल्याची माहिती धरणग्रस्तांना देत असताना.
क्रमांक : १८०३२०२१-गड-०१
फोटो ओळी : आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथे कायदा बाजूला सारून घळभरणीचे काम सुरू आहे. कायदा असताना घळभरणी कशी केली जाते ? कायद्याची प्रतच डिजिटल करून मेळाव्याच्या ठिकाणी आर्दाळ (ता. आजरा) येथे लावण्यात आली होती. (ऋतुजा फोटो)
क्रमांक : १८०३२०२१-गड-०४
---------------------------