सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करा, अन्यथा..; मनोज जरांगे-पाटील यांचा सरकारला पुन्हा इशारा
By पोपट केशव पवार | Published: August 9, 2024 06:44 PM2024-08-09T18:44:08+5:302024-08-09T18:46:36+5:30
'राजर्षी शाहू महाराज यांनी गोरगरीब मराठ्यांना दिलेले आरक्षण परत मिळवण्यासाठी मला साथ द्या'
कोल्हापूर : मराठा आरक्षणाचा प्रश्न अंतिम टप्प्यात आहे. कुणबी नोंदी शोधण्यासाठी सरकारला सहा महिन्यांची मुदत दिली होती. त्यांनी सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी केली नाही तर लोकसभेप्रमाणे येणाऱ्या विधानसभेलाही त्यांच्या जागा पाडणारच, असा थेट इशारा मराठा आरक्षणाचे लढाऊ नेते मनोज जरांगे-पाटील यांनी शुक्रवारी कोल्हापुरात दिला. राजर्षी शाहू महाराज यांनी गोरगरीब मराठ्यांना दिलेले आरक्षण परत मिळवण्यासाठी मला साथ द्या, अशी भावनिक सादही त्यांनी कोल्हापुरकरांना घातली.
मराठा आरक्षणासाठी जरांगे-पाटील यांची कोल्हापुरात आरक्षण जनजागृती व शांतता रॅली मोठ्या उत्साहात पार पडली. मिरजकर तिकटी येथून सुरू झालेल्या रॅलीचे छत्रपती शिवाज महाराज चौकात आल्यानंतर सभेत रूपांतर झाले. आपल्या १५ मिनिटांच्या भाषणात जरांगे-पाटील यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारवर तोफ डागताना महापूर, अलमट्टी, शेती या विषयांनाही स्पर्श करत कोल्हापुरकरांच्या भावनेला हात घातला.
जरांगे-पाटील म्हणाले, सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी झाली की आरक्षणाचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे. अन ती घेतल्याशिवाय मी थांबत नाही. सरकारला काय ताकद लावायची ती लावू द्या. वेळ आली की गोडीने, हात जोडून सांगतो, आरक्षण द्या. पण नाहीच ऐकले तर गोरगरिब मराठ्यांची पोरं मोठी करण्यासाठी यांना पाडावेच लागेल. शेवटचा पर्याय तेवढाच आहे. ती देणार नसाल तर पाडायच्या भूमिकेत यावे लागेल. मराठ्यांच्या आरक्षणाबरोबरच मुस्लिम व धनगर आरक्षणाचाही प्रश्नही मी हातात घेतला आहे. छत्रपती शाहू महाराज यांनी त्याकाळी गोरगरीब मराठ्यांना आरक्षण दिले होते. मात्र, काही जातीयवादी नेत्यांनी हे आरक्षण उडवून टाकले. शाहूंनी दिलेले आरक्षण परत मिळवायचे असेल तर मला साथ द्या, अशी भावनिक सादही जरांगे-पाटील यांनी कोल्हापूरकरांना घातली.
पाडायचे की उभा करायचे यासाठी २९ ला अंतरवलीला या
येणाऱ्या विधानसभेला सकल मराठा समाजाच्या वतीने उमेदवार उभे करायचे की जे आरक्षण देणार नाहीत त्यांचे उमेदवार पाडायचे, याचा फैसला येत्या २९ ऑगस्टला अंतरवली सराटी येथील सभेत घेण्यात येणार आहे. त्यासाठी कोल्हापूरकरांनी या सभेला मोठ्या संख्येने यावे, असे आवाहनही जरांगे-पाटील यांनी केले.
पक्षासाठी नको, पोराबाळांसाठी लढा
सत्ताधाऱ्यांनी मला चारही बाजूंनी घेरले आहे. सर्वजण माझ्या पाठीमागे लागले आहेत. मात्र, तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही, असा शब्द देत पक्ष, पक्षातील नेते मोठे करण्यापेक्षा स्वत:च्या पोराबाळांचे भविष्य पाहा, त्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी तुम्ही लढा, असे आवाहन जरांगे-पाटील यांनी समाजबांधवांना केले.