Rajya Sabha Election: राज्यसभेसाठी संभाजीराजेंचे गणित जुळणार? आकडेवारी नेमकी कशी..जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 11:39 AM2022-05-17T11:39:03+5:302022-05-17T11:40:16+5:30
भाजपने तिसरा उमेदवार रिंगणात उतरविला नाही आणि एखादा ताकदवान अपक्ष रिंगणात उतरला नाही तर सध्यातरी कागदावर त्यांचे गणित जमू शकते, अशी आकडेवारी सांगते.
विश्वास पाटील
कोल्हापूर : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी येत्या १० जूनला होऊ घातलेल्या निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांना महाविकास आघाडीतील तीन प्रमुख घटक पक्ष व या आघाडीला पाठिंबा दिलेल्या सर्व १६ अपक्षांनी पाठिंबा दिल्यास त्यांचा नव्याने राज्यसभेत जाण्याचा मार्ग सुकर होऊ शकतो.
भाजपने तिसरा उमेदवार रिंगणात उतरविला नाही आणि एखादा ताकदवान अपक्ष रिंगणात उतरला नाही तर सध्यातरी कागदावर त्यांचे गणित जमू शकते, अशी आकडेवारी सांगते. उरण (जि. रायगड)चे अपक्ष आमदार महेश बालदी यांनी सोमवारी त्यांच्या उमेदवारीस पाठबळ दिले आहे. बालदी मूळचे भाजपचे असून ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यांची संमती घेतल्याशिवाय त्यांनी संभाजीराजे यांच्या उमेदवारीस बळ देणे शक्य नाही. त्यामुळे भाजपची भूमिकाही संभाजीराजे यांच्यासारठी पूरक राहते की काय, ही उत्सुकता आहे.
३१ मे रोजी लढतीचे चित्र स्पष्ट होणार
महाराष्ट्र विधानसभेतून निवडून देण्याच्या सहा जागा रिक्त होत आहेत. त्यासाठी २४ ते ३१ मेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यामुळे ३१ मे रोजीच या लढतीचे चित्र स्पष्ट होईल. संभाजीराजे यांच्या उमेदवारीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा दिला आहे. पवार यांनी मनांत आणले तर ते महाविकास आघाडीला संभाजीराजे यांच्या पाठीशी उभी करू शकतात. तशा हालचालीही सुरू आहेत. महाविकास आघाडीतून शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो.
पहिल्या पसंतीची ४२ मतांची गरज
निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची ४२ मतांची गरज आहे. महाविकास आघाडीचे तिघे निवडून आल्यावर त्यांच्याकडे २५ मते शिल्लक राहतात. या आघाडीला इतर पक्ष व अपक्ष मिळून १६ आमदारांचा पाठिंबा आहे. ती संभाजीराजे यांना मिळाल्यास त्यांचा विजय सोपा होऊ शकतो. परंतु त्यासाठी भाजपने तिसरा उमेदवार रिंगणात उतरविला नसला तरच हे शक्य आहे. भाजपचे सध्या तीन खासदार आहेत. त्यामुळे त्यांनी तीन उमेदवार उभे केल्यास आणि त्यातही तिसरा उमेदवार आर्थिक ताकदीचा दिल्यास या जागेची लढत चुरशीची होऊ शकते.
भाजपला १३ मतांची जोडणी करावी लागणार
भाजपला राज्यसभेतही संख्याबळ आवश्यक असल्याने ते तिसरा उमेदवार नक्की देतील असेच चित्र आहे. भाजपकडे त्यांची स्वत:ची २२ व अपक्षांची ७ अशी २९ मते शिल्लक आहेत. त्यांनाही तिसरी जागा निवडून आणायची झाल्यास १३ मतांची जोडणी करावी लागणार आहे.
महाविकास आघाडी
- शिवसेना - ५६ (एक रिक्त)
- राष्ट्रवादी - ५३
- काँग्रेस - ४४
- बहुजन विकास आघाडी - ०३
- समाजवादी पक्ष - ०२
- प्रहार जनशक्ती पक्ष - ०२
- शेकाप - ०१
- अपक्ष - ०८
- एकूण - १६९