संभाजीराजेंच्या जिवाला धोका झाल्यास महाराष्ट्र पेटेल, सकल मराठा समाजाच्या भावना तीव्र
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 02:23 PM2022-02-28T14:23:40+5:302022-02-28T14:28:57+5:30
आंदोलनस्थळी भेट द्यायला मंत्र्यांना वेळ नाही, त्यांचा निषेध करण्यासाठी त्यांच्या बंगल्याला घेराव घालण्याचा इशारा
कोल्हापूर : गेले दोन दिवस खासदार संभाजीराजे उपोषणाला बसले आहेत, त्यांची प्रकृती खालावत असून त्यांच्या जीवाला काही बरे-वाईट झाले तर महाराष्ट्र पेटेल, याचे भान राज्यकर्त्यांनी ठेवावे, असा इशारा सकल मराठा समाजाने रविवारी दिला. आंदोलनस्थळी भेट द्यायला मंत्र्यांना वेळ नाही, त्यांचा निषेध करण्यासाठी त्यांच्या बंगल्याला घेराव घालण्याचा इशारा जिजाऊ ब्रिगेडने दिला.
दसरा चौकात रविवारी दुसऱ्या दिवशीही साखळी उपोषण करण्यात आले. दिवसभरात विविध संघटना, सामाजिक संस्था, तरुण मंडळांनी भेट देऊन पाठिंबा दिला.
मुस्लीम बोर्डिंगचे प्रशासक कादर मलबारी म्हणाले, मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत, सरकारने निर्णय घेतला नाही तर त्याचे पडसाद उमटणार आहेत. कोणी राजकीय भांडवल न करता दसरा चौकात जास्तीत जास्त लोक सहभागी होण्यासाठी प्रयत्न करा. समाजाच्या आडून कोणी स्वत:ची पोळी कोणी भाजू नये.
मुस्लीम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर म्हणाले, सरकारला वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत का? पंढरपूर, नाशिक बंद होते, मग आपण मागे का? आजपासून आंदोलन अधिक तीव्र केले पाहिजे. जिजाऊ ब्रिगेडच्या सुधा सरनाईक म्हणाल्या, सरकार बेदखल करणार असेल तर आता वाट पाहात बसू नये, मंत्र्यांच्या बंगल्याला घेराव घालूया.
सचिन तोडकर म्हणाले, सरकारला मंगळवारपर्यंतचा अल्टीमेटम देतो, यापुढे आम्ही गप्प बसणार नाही. बुधवारपासून जिल्ह्यात उद्रेक होईल. त्याचा वणवा महाराष्ट्रभर पेटल्याशिवाय राहणार नाही. मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, दसरा चौकातील आंदोलन कायम राहणार आहे, सरकारला निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस आहे. तो घेतलाच नाही तर उद्या, मंगळवारी तयारी करून बुधवारी कोल्हापूर बंद केले जाईल. तेथून पुढे एल्गारला सामोरे जावे.
माजी खासदार धनंजय महाडिक म्हणाले, भाजप सरकारच्या काळात मराठा समाजाच्या मागण्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला. मात्र, आघाडी सरकारला समाजाचे प्रश्न सोडवायचे नाहीत. त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र करण्याची गरज आहे.
यावेळी प्रसाद जाधव, ॲड. राजेंद्र कडदेशमुख, लता जगताप, सुनीता पाटील आदी उपस्थित होते.
बेळगाव पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा
बेळगावचे माजी महापौर शिवाजी सुंठकर, पंचायत समिती सदस्य सुनील अष्टेकर, भालचंद्र पाटील, पुंडलिक पावशे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला.
या संघटनांनी दिला पाठिंबा
संयुक्त रविवार पेठ, प्रहार जनशक्ती पक्ष, भीम ब्रिगेड संघटना, राजर्षी शाहू दिव्यांग संस्था, शिवाजी चौक तरुण मंडळ, हळदी, मराठा जागृत मंच, लिंगायत समाज संस्था, चित्रदुर्ग मठ, अंबाजी खामकर गुरुजी गृहनिर्माण संस्था