संजय राठोड यांचा राजीनामा न घेतल्यास सभागृह चालू देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:47 AM2021-02-28T04:47:34+5:302021-02-28T04:47:34+5:30
कोल्हापूर : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा सोमवारच्या आत राजीनामा घेऊन चौकशी सुरू केली नाही, तसेच राज्य ...
कोल्हापूर : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा सोमवारच्या आत राजीनामा घेऊन चौकशी सुरू केली नाही, तसेच राज्य सरकारने विधिमंडळाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात याबाबत नेमके काय घडले आहे, हे जाहीर केले नाही, तर सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिला.
भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीच्या विरोधात एसीबीने करवाई सुरू केल्यामुळे भाजपच्या गोटात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी राठोड यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. चित्राताईंसारख्या वाघिणीला त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर त्या घाबरणार नाहीत. भाजपा पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे. त्यांच्या पतीने आर्थिक हेराफेरी केली असेल तर जरूर चौकशी करा. पण चौकशी करण्याची भीती दाखवून चित्राताई गप्प बसणार नाहीत, असे पाटील म्हणाले.
- पाटील यांनी उपस्थित केलेले प्रश्न -
- घटना घडली तेव्हा उपस्थित असणारे दोघे कोठे आहेत ?
- पूजावर उपचार करणारे डॉ. रोहिदास चव्हाण अचानक गायब कसे झाले ?
- जवळच्या नांदेड रुग्णालयात गर्भपात न करता यवतमाळमध्ये का झाला ?
- पोलिसांनी ऑडिओ क्लिपमध्ये संजय राठोड यांचा आवाज नाही हे तपासले का ?
- केंद्रीय महिला आयोगाने आदेश दिला, तो पोलिसांनी सबमिट केला का?
ठाकरेंचा सत्यवादीपणा व्यवहारात नाही-
उध्दव ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरेंचे नातू आहेत. अन्यायाविरुध्द आवाज उठविणाऱ्या बाळासाहेबांचे पुत्र आहेत. त्यामुळे ते सत्यवादी आहेतच. पण व्यवहारात त्यांचा हा सत्यवादीपणा दिसत नाही. त्यांना फक्त त्यांच्या खुर्चीची काळजीच दिसते, अशी खोचक टीका प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केली.