हंगाम लांबल्यास ऊस उत्पादकांना भुर्दंड

By admin | Published: October 13, 2016 01:33 AM2016-10-13T01:33:44+5:302016-10-13T02:09:28+5:30

पीककर्ज व्याज वाढणार : महिन्याला दहा कोटींचा फटका बसणार; रब्बीतील पिकावरही परिणाम होणार

If the season is over, | हंगाम लांबल्यास ऊस उत्पादकांना भुर्दंड

हंगाम लांबल्यास ऊस उत्पादकांना भुर्दंड

Next

प्रकाश पाटील --कोपार्डे --यंदाच्या हंगामात उसाचे क्षेत्र दुष्काळसदृश परिस्थितीने घटल्याने ऊस उत्पादन कमी होणार आहे. हा मुद्दा पकडत मंत्री समितीच्या बैठकीत तब्बल एक महिना गाळप हंगाम पुढे ढकलण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. मात्र, हाच निर्णय कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरणार आहे. शेतकऱ्यांवर प्रत्येक महिन्याला पीक कर्जावर १० कोटींचे व्याज बसणार आहे. याचा रब्बी हंगामावरही परिणाम होणार असल्याचे या उद्योगातील तज्ज्ञ व ऊस उत्पादक शेकऱ्यांकडून मत व्यक्त करण्यात येत आहे.
ऊस उत्पादकांना प्रतिएकर पीककर्ज ३५ हजार रुपयांप्रमाणे दिले जाते. या कर्जाची वसुली उसाच्या तोडणीनंतर कारखाने देत असलेल्या ऊस बिलातून होते. या पीक कर्ज वसुलीची जूनअखेर परतफेडीची मुदत असते. मात्र, गाळप हंगाम एक महिना लांबल्यास तोड होणाऱ्या उसाचे बिल एक महिना उशिरा येणार आहे. यामुळे संपूर्ण हंगामात जरी उसाची एक-एक महिना उशिरा तोड झाल्यास पीककर्ज भरण्याची प्रक्रिया शेतकऱ्यांना हातात पैसा न आल्याने वेळेत करता येणार नाही. जोपर्यंत या पीककर्जाचा परतावा शेतकऱ्यांकडून होणार नाही, तोपर्यंत बॅँका व्याज आकारणी करणार आहेत. त्यामुळे १ नोव्हेंबरऐवजी १ डिसेंबरला हंगाम सुरू करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचा कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दर महिन्याला १० कोटींचा केवळ व्याजातून फटका बसणार आहे.
जिल्ह्यात हंगाम २०१५-१६ मध्ये जिल्हा बॅँक, खासगी व राष्ट्रीयीकृत बॅँकांच्या माध्यमातून २१६९ कोटींचे पीककर्ज वाटप केले आहे. यावर सर्व बॅँका १२ टक्के व्याज आकारणी करतात. यातून पंजाबराव देशमुख व्याज परताव्यातून शेतकऱ्यांना सूट देऊन सरासरी ६ टक्के व्याजाची आकारणी केली जाते.
जिल्ह्यातील सर्व बॅँकांनी पीककर्जाच्या माध्यमातून वाटलेल्या रकमेवर ६ टक्केप्रमाणे जरी व्याज पकडले, तरी २१६९ कोटी पीककर्जाचे महिन्याचे व्याज १३ कोटी रुपये होणार आहे.
जर कारखाने १ नोव्हेंबरऐवजी १ डिसेंबरला सुरू झाले, तर उसाची तोडणीही महिन्याच्या अंतराने लांबणार आहे. याचा तोटा शेतकऱ्यांना होणार असून खते, मशागत यामध्ये झालेल्या उत्पादन वाढीने आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना उसाचे क्षेत्र सांभाळताना कसरत करावी लागणार आहे.


एकरी उतारा घटणार
आडसाली व पूर्वहंगामी उसाचे आजचे वय पाहिल्यास १५ महिन्यांचे आहे. हंगाम एक महिना पुढे गेल्यास हा ऊस तुटण्यासाठी किमान १७ ते १८ महिने पूर्ण होणार आहेत.
यामुळे उसाच्या एकरी उत्पादनात मोठी घट होणार असून, याचा परिणाम साखर कारखान्यांच्या गाळप उद्दिष्टावरही होणार आहे.

रब्बी हंगामावर परिणाम होणार
उसाचे क्षेत्र तुटण्यास यावर्षी १ डिसेंबरला सुरुवात झाल्यास मोठी घट होणार आहे. सर्वसाधारण रब्बी हंगामाला डिसेंबरमध्ये सुरुवात होते. उसाचे क्षेत्र तुटल्यानंतर जिल्ह्यातील शेतकरी भुईमूग, गहू, सूर्यफूल, सोयाबीन यासारखी पिके रब्बी हंगामात घेतात. मात्र, एक महिना हंगाम उशिरा सुरू झाल्यास उसाखालील क्षेत्र न तुटल्यास शेतकऱ्यांना रब्बी हंगाम घेताना अडचणी येणार असून, यामध्ये मोठी घट होण्याचा अंदाज कृषितज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
पाण्याचा अतिरिक्त वापर अटळ
मागीलवर्षी पाण्याच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांना ऊस पीक सांभाळताना कसरत करावी लागली. परिणामी, हंगाम एक महिना लांबल्यास ऊस पीक सांभाळण्यासाठी पाण्याचा अतिरिक्त वापर होणार असून, पाणी बचतीला ठेंगा बसणार आहे.

हंगाम लांबल्यास शेतकरी उसाची विल्हेवाट लावण्यासाठी इतरत्र प्रयत्न करणार. यामुळे कारखान्यांना गाळप उद्दिष्ट गाठण्यास अडचणी येईल. त्याशिवाय पीककर्जाच्या व्याजाचा बोजा पडण्याबरोबर रब्बी हंगामही अडचणीत येणार आहे. त्यामुळे १ नोव्हेंबर ही हंगाम सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कारखाने १ नोव्हेंबरला सुरू करण्याची परिस्थिती आहे.
- चंद्रदीप नरके, अध्यक्ष कुंभी-कासारी साखर कारखाना

मागीलवर्षी पाण्याच्या कमतरतेने शेतकरी हैराण झाला होता. त्यातच खते, मशागत यांच्या दरांमध्ये मोठी वाढ झाल्याने व एफआरपीत एक रुपयाही वाढ झाली नसल्याने शेतकरी अगोदरच अडचणीत आहे. पुन्हा हंगाम लांबल्यास याचा दूध व्यवसायावरही अप्रत्यक्ष परिणाम होणार आहे. रब्बी पिके घेताना उसाचे क्षेत्र तुटले तरच शक्य आहे. असे अनेक परिणाम होणार असून, हंगाम १ नोव्हेंबरला सुरू होणेच योग्य आहे.
- अविनाश शिपुगडे, शेतकरी, शिंगणापूर, ता. करवीर.

Web Title: If the season is over,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.