दुसरा डोस मिळेना, नागरिकांचा सेवा रुग्णालयाबाहेर रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:28 AM2021-07-07T04:28:56+5:302021-07-07T04:28:56+5:30
कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या दुसऱ्या डोससाठीच्या ८४ दिवसांची मुदत संपूनही लसीचा दुसरा डोस उपलब्ध होत नसल्याने संतप्त ...
कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या दुसऱ्या डोससाठीच्या ८४ दिवसांची मुदत संपूनही लसीचा दुसरा डोस उपलब्ध होत नसल्याने संतप्त नागरिकांनी सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सेवा रुग्णालयासमोरील मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले.
यावेळी नागरिकांनी घोषणाबाजी करत वाहतूक रोखून धरली. सेवा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. उमेश कदम यांनी वस्तुस्थिती सांगितल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. प्रा. लक्ष्मण करपे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी आंदोलन केले.
सेवा रुग्णालय, लाईन बाजार येथे पहाटे पाच वाजल्यापासून नागरिक लसीसाठी थांबून असतात. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसह महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित असतात. पहाटेपासून रांगेत थांबल्यानंतर सकाळी लस उपलब्ध नाही असा फलक पाहिल्यानंतर नागरिकांचा राग अनावर झाला. यावेळी त्यांनी प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा देत रास्ता रोको आंदोलन केले. ८४ दिवस उलटून बरेच दिवस झाले. दररोज येऊन रांगेमध्ये थांबून परत जावे लागते. पण लस उपलब्ध होत नसल्याने नागरिक संतप्त झाले. आणि त्यातूनच रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
कोट :
लोकांचा उद्रेक मी समजू शकतो. पण लस उपलब्ध होणार किंवा नाही याचा मेसेज आमच्याकडे सकाळी सात वाजता येतो. त्यानंतर आम्हाला पुढील नियोजन करावे लागते. तरीसुद्धा लोकांच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवल्या जातील.
डॉ. उमेश कदम
अधिष्ठाता, सेवा रुग्णालय, लाईन बझार.