अकरानंतर दुकाने उघडी ठेवल्यास आता थेट गुन्हाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:25 AM2021-05-08T04:25:49+5:302021-05-08T04:25:49+5:30
कोल्हापूर : अत्यावश्यक सेवा वगळून निर्धारित वेळेनंतरही अनेक दुकाने सुरू आहेत. याची खातरजमा स्वत: जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश ...
कोल्हापूर : अत्यावश्यक सेवा वगळून निर्धारित वेळेनंतरही अनेक दुकाने सुरू आहेत. याची खातरजमा स्वत: जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी शुक्रवारी शहरात फिरून केली. याबाबत दुपारी पोलीस ठाण्याचे प्रभारी व उपविभागीय अधिकाऱ्यांच्या तातडीने घेतलेल्या बैठकीत अशा दुकानदारांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यामुळे आज, शनिवारपासून अकरानंतर दुकाने उघडी ठेवणाऱ्या दुकानदारांवर गुन्हे दाखल होणार आहेत.
दुसऱ्या लाटेतील कोरोना साखळी तोडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. पोलीस दलही २४ तास बंदोबस्त देत आहे. नागरिकांच्या दैनंदिन गरजा भागण्यासाठी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत संचारबंदीमध्ये शिथिलता आणली आहे. यात केवळ अत्यावश्यक सेवा वगळून दिलेल्या वेळेनंतरही अनेक दुकाने सुरू ठेवली जात आहेत. याची खातरजमा स्वत: जिल्हा पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी शुक्रवारी शहरात फिरून केली. नागरिकांचा हलगर्जीपणा पाहून त्यांनी दुपारी प्रभारी पोलीस अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलाविली. यात त्यांनी शहरातील स्थितीबाबत चर्चा केली. त्यानुसार सकाळी अकरानंतर जे दुकानदार आपली दुकाने उघडी अथवा अर्धवट उघडी ठेवतील, त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले. अनेक व्यावसायिक व्यावसायिक परवाना नसतानाही व्यवसाय करीत असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले. कोरोना साखळी तुटेपर्यंत पोलीस प्रशासनास नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी केले आहे.
३ लाख ६९ हजारांचा दंड
मास्कचा वापर न केल्याबद्दल ३४७ जणांकडून ६८ हजार ३००, तर मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल १४९६ केसेसमधून ३ लाख १ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला. अनावश्यक वाहन घेऊन फिरणाऱ्या व्यक्तींकडून ११० वाहनेही जप्त केली, असा एकूण ३ लाख ६९ हजारांचा दंड पोलीस दलाने दिवसभरात वसूल केला.