साखर उद्योग संपला, तर त्यास पीयूष गोयल जबाबदार: हसन मुश्रिफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:24 AM2020-12-29T04:24:24+5:302020-12-29T04:24:24+5:30
कोल्हापूर : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे दिवसेंदिवस साखर कारखानदारी मोडीत निघाली आहे. याबाबत केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांना लक्ष ...
कोल्हापूर : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे दिवसेंदिवस साखर कारखानदारी मोडीत निघाली आहे. याबाबत केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांना लक्ष घालण्याची विनंती केली. मात्र, ते व्यापारी असल्याने दुर्लक्ष करत आहेत. महाराष्ट्रातील साखर उद्योग संपला, तर त्यास मंत्री गोयल जबाबदार असतील, असा इशारा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रिफ यांनी रविवारी दिला. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या ‘ई-लॉबी’ भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.
मंत्री मुश्रिफ म्हणाले, साखरेचे दर प्रतिक्विंटल ३१०० रुपये आणि उसाची एफआरपी याचा ताळमेळ बसत नाही. टनामागे ४०० ते ५०० रुपये कमी पडत असल्याने हा उद्योग अडचणीत आला आहे. पुढील हंगामात उसाचे आणखी पीक वाढणार आहे. मात्र, साखर कारखाने बंद पडण्याचा धोका आहे. कारखान्यांचे कंबरडे मोडल्यानंतर निर्यातीचा निर्णय घेतला.
------------------------------
उपपंतप्रधान पदासाठी मुश्रिफांना शुभेच्छा
जिल्हा बँकेच्या जुन्या इमारतीचे भूमिपूजन यशवंतराव चव्हाण यांच्याहस्ते झाले होते. भूमिपूजनानंतर ते थेट देशाचे उपपंतप्रधान झाले. आता या इमारतीचे भूमिपूजन हसन मुश्रिफ यांच्याहस्ते झाले, तेही उपपंतप्रधान व्हावेत, अशा शुभेच्छा आमदार पी. एन. पाटील यांनी दिल्या. यावर मुश्रिफ यांनी त्यांचे आभार मानले.
------------------------------
कोल्हापूर जिल्हा बँकेचे तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज बिनव्याजी
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक एप्रिल २०२१ पासून शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज बिनव्याजी देणार असल्याची घोषणा बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रिफ यांनी रविवारी केली. केंद्र सरकारने अपात्र कर्जमाफी रद्द केल्याने अनिष्ट दुराव्यात सापडलेल्या विकास संस्थांची व्याज आकारणी बंद करूच, त्याचबरोबर नाबार्डने व्याजासह पैसे दिले, तर तेही संस्थांना परत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.